किरण शिंदे
पुणे: जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला. त्यानंतर झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत झालेल्या भावजयीला त्याने रुग्णालयातही नेले.. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश झाला.. आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ही घटना १४ ऑगस्ट रोजी केशवनगर परिसरात घडली. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता नागराज गडदर (वय २४, साईबाबा कॉलनी, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा दीर मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडदर दांपत्य मूळचे कर्नाटकातले. मागील काही वर्षांपासून पुण्यातील केशवनगर परिसरात वास्तव्यास होते. आरोपी मल्लिकार्जुन हा भावाच्या घरी राहत होता. आरोपी काही कामधंदा करत नव्हता शिवाय त्याला दारूचे व्यसन देखील होते. दारू पिण्यावरून आरोपी आणि मयत महिला यांच्यात यापूर्वी भांडणही झाले होते. दरम्यान घटनेच्या दिवशी आरोपीचा मोठा भाऊ मूळ गावी गेला होता. घरी आरोपी शरणाप्पा, मयत कविता आणि त्यांची दोन मुले होते. त्यादिवशी आरोपी आणि मयत यांच्यात पुन्हा भांडण झाले. आरोपीने शिवीगाळ केल्याने मयत कविता यांनी त्याच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने शरणाप्पा गडदरे यांनी कविता यांचा खून केला.
कानाखाली मारल्यानंतर शरणाप्पा बाहेर गेला. काही वेळाने पुन्हा घरी परत आला. घरी आल्यानंतर तो कविता झोपण्याची वाट पाहू लागला. कविता आणि त्यांचा लहान मुलगा दोघे घरात झोपले होते. तर छोटी मुलगी घरात खेळत होती. आरोपीने या छोट्या मुलीला बाहेर खेळण्यासाठी पाठवलं आणि झोपेत असलेल्या कविता गडदरे यांच्या चेहऱ्यावर उशी दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो घरात बसून राहिला. काही वेळानंतर त्याने कविता घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली असा बनाव रचत जवळच्या रुग्णालयात तिला घेऊन गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी कविताला मदत घोषित केले.
त्यानंतर ससून रुग्णालयात कविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पोस्टमार्टममध्ये कविता यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी शरणाप्पा गडदरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक निकम अधिक तपास करत आहेत.