बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात शुक्रवारी (दि. १८) ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे, तर बारामती शहर परिसरात ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याचे चित्र आहे. परिणामी पीकवाढीचे चक्र बिघडण्याची भीती कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.यंदाच्या दुष्काळाने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र स्वरूप धारण केले आहे. जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. नीरा डावा कालव्यास पाणी नसल्याने विंधनविहिरीदेखील कोरड्या पडल्या आहेत. त्यातच दुष्काळाने पाण्याची उन्हाची दाहकता असह्य करून टाकली आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात येथील पारा कमाल ४२ अंशांवर पोहोचला. तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापमापक केंद्रावर कमाल ४२ अंश सेल्सिअस नोंद झाली, तर बारामती शहर परिसरात संपूर्ण महिनाभर ३४ ते ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान गेल्या तीन-चार दिवसांत ३७.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर कमाल तापमानाची १८.९ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. यंदाचा उन्हाळा अधिक दमछाक करणारा ठरणार आहे. कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)- ऊसपिकावर १५ दिवसांच्या अंतराने २ टक्के पोटॅश फवारणी करावी. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. शक्य त्या ठिकाणी पाचट पसरावे. - उसाला सायंकाळी ६ नंतर पाणी द्यावे. दिवसा पाणी देणे टाळावे. वारा असल्यानंतर पाणी देऊ नये. उष्णतेच्या तीव्रतेवर बाष्पीभवनाचा वेग अवलंबून असतो. - लागवड केलेल्या पहिल्या तीन महिन्यातील उसावर तापमानवाढीचा परिणाम होण्याची भीती अधिक आहे. तर बांधणी केलेल्या उसाची पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता असते.- नवीन फळबाग लागवडीवर आच्छादन करावे. रासायनिक खतांचा वापर टाळावा. सेंद्रिय, द्रवरूप खतांचा वापर अधिक उत्तम आहे.वाढत्या तापमानाबरोबरच पिकांच्या पानांच्या रंध्रातून बाष्पीभवनाचा वेगदेखील वाढला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीच्या चक्रावर विपरित परिणाम होणार आहे़ उष्णतेच्या तीव्रतेने पिकांची वाढ खुंटते. - बी. एस. घुले, कृषितज्ज्ञ
भवानीनगर, बारामती तापले !
By admin | Published: March 19, 2016 2:40 AM