बावडा : बावडा परिसराला वरदान मानल्या गेलेल्या नीरा व भीमा या दोन्ही नद्यांची वाळूमाफियांनी चाळण केली आहे. भीमा नदीपात्रातून भांडगाव ते बावडा हद्दीत बेसुमार वाळूउपसा अद्यापही सुरुच आहे. वाळूमाफियांना महसूल विभागाचे दुर्लक्ष की जाणीवपूर्वक अभय अशीच या भागात चर्चा आहे.या भागात मागील तीन-चार वर्षे दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी या दोन्ही नद्यांमधून बेसुमार वाळूउपसा झाला. पात्रामध्ये ठिकठिकाणी विहिरीसारखे खड्डे तसेच डोंगराएवढे वाळूचे ढीग निर्माण झाले आहेत. मागील वर्षी मोसमाच्या शेवटी परतीच्या पावसाने दिलासा दिला. त्यामुळे नद्यांना वरील धरणांतून पाणी सोडण्यात आले. खुलेआम वाळूतस्करांचे आर्थिक हितसंबंध शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असल्याने त्यांच्या गुंडगिरीमध्येही मोठी वाढ झाली आहे. अवैध वाळूच्या धंद्यातून मिळणाऱ्या बेमाप अवैध संपत्तीमुळे वाळूमाफिया सतत अरेरावी करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे किमान शासनाने यावर अंकुश ठेवावा, अशी मागणी परीसरातून होत आहे. जर या प्रकारांना लवकरात लवकर आळा बसला नाही तर इंदापूर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष रणधीर भोसले यांनी दिला आहे. (वार्ताहर)
भीमा नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा
By admin | Published: January 24, 2017 1:24 AM