पुणे : भेकराईनगर (ता. हवेली), सासेवाडी (ता. भोर) येथील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील १८ लाख ११ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने नुकतीच उघडकीस आणली.
फुरसुंगीमधील भेकराईनगर येथील शिवशंकर हाईट्स परिसरातील १८ वीजग्राहक वीजमीटरला बायपास करून थेट वीजवापर करीत असल्याचे भरारी पथकाच्या तपासणीत आढळून आले. यामध्ये १७ घरगुती व एका वाणिज्यिक ग्राहकांनी ५४ हजार १४ युनिटची म्हणजे ६ लाख ६५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या वीजबिलासोबतच त्यांना १ लाख ८ हजार रुपयांच्या दंडाचे वेगळे वीजबिल देण्यात आले आहे.
सासेवाडी (ता. भोर) येथील एस. पी. एंटरप्रायजेस या औद्योगिक ग्राहकाच्या वीजसंचाची भरारी पथकाने तपासणी केली असता केबलला जमिनीखाली टॅपिंग करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले. या ग्राहकाने गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत ४२ हजार ७७० युनिट म्हणजे ७ लाख २८ हजार रुपयांची वीजचोरी केली. त्यास वीजचोरीचे वीजबिल व ३ लाख १० हजार रुपयांच्या दंडाचे वेगळे बिल देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार कारवाई सुरू आहे. वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ पाटील व नरेंद्र रडे, उपकार्यकारी अभियंता कैलास काळे व आवधकिशोर शिंदे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी अश्विनी भोसले, तंत्रज्ञ गणेश कराड आदींनी कामगिरी केली.