पुणे : महात्मा जाेतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवली ते ठिकाण म्हणजे भिडे वाडा. अगदी दगडूशेठ मंदिरासमोरच हा वाडा आहे. यापासून अगदी दाेनशे मीटर अंतरावर माझे घर. माझा जन्मही येथेच झालेला; पण या ऐतिहासिक वास्तूबाबत अनभिज्ञ असल्याने कधी आवर्जून जाण्याचा प्रसंग आला नाही. शनिवारवाडा, लाल महालात जायचाे; पण शेजारी असलेल्या भिडे वाड्यात का नाही गेला; असे आज स्वत:ला विचारताे तेव्हा वाड्याची भग्नावस्था आणि लाेकांचे अज्ञान डाेळ्यापुढे तरळते. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिलासादायक निकालानंतर पुन्हा येथे शाळा सुरू हाेणार म्हटल्यानंतर वेगळाच आनंद वाटत आहे. जे मला कळले नाही, ते माझ्या पुढील पिढीला कळेल, याचे समाधान वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक प्रत्यक्षात कधी येईल आणि कधी ते पाहता येईल याची उत्सुकताही लागली आहे.
भिडे वाडा हा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत हाेती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच हा प्रश्न निकाली काढत जागेचा अडथळा दूर केला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, आता महापालिकेची आणि तमाम पुणेकरांची जबाबदारी वाढली आहे.
भिडे वाडा हा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बुधवार पेठेत. जाे परिसर वेगळ्याच कारणाने कायम बदनाम आहे. त्यामुळे मी बुधवारात राहताे, असे सांगण्यास लाेक धजावत नसे; पण भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रत्यक्षात साकारले जाईल तेव्हा येथील नागरिकही अभिमानाने म्हणतील मी बुधवार पेठेत भिडे वाड्याच्या तिथे राहताे म्हणून.
या पेठेत आजूबाजूला कापड, भाजी, इलेक्ट्रॉनिक, मिठाई, पुस्तके आदींची बाजारपेठ आहे. लाल महाल, शनिवारवाडा, मंडई, विश्रामबाग वाडा या ऐतिहासिक स्थळांबरोबरच दगडूशेठ मंदिर, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील मंदिरे देखील आहेत. अशा ठिकाणी मध्यभागातच हा भिडे वाडा वसला आहे. पर्यटनासाठी नागरिक पुण्यात आल्यावर या भागात सर्वात पहिल्यांदा येतात. कुठे नाही तर शनिवारवाड्याला नक्कीच भेट देतात; पण भिडे वाड्याकडे कधीही फिरकताना दिसले नाहीत. हे चित्र भविष्यात नक्कीच बदललेले असेल, यात शंका नाही.
आजवर भिडे वाड्याच्या समोरच दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी प्रसिद्ध अभिनेते, राजकीय पदाधिकारी आले; पण १० मिनिटे थांबून कधीही भिडे वाड्याची अवस्था पाहिली नाही. येथेच १ जानेवारी १८४८ रोजी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू झाल्याने, याची माहिती असलेलीच मंडळी तीही फक्त १ जानेवारीला येथे येत होती. चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून स्मारकासाठी आंदोलन झालेले पाहिले; पण वाड्याच्या आसपास असलेल्या अनेक नागरिकांनाच या वाड्याबाबत फार काही माहिती नसणे ही शाेकांतिका आहे. आजही अनेकांना महात्मा फुले पेठेतील फुले वाडा हाच भिडे वाडा वाटताे. अनेकांनी तसे बोलूनही दाखवले. इतक्या मोठ्या प्रमाणावर भिडे वाडा दुर्लक्षित झाला होता. आम्ही सुद्धा शाळेमध्ये असताना भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू झाली एवढंच ऐकलं होतं; पण त्याठिकाणी जाऊन पाहण्याची शाळेत कधीही चर्चा झाली नाही. बहुतेक बिकट अवस्था असल्याने शाळेतूनच तो दाखवण्याचे काही नियोजन नसावे. यामध्ये त्या लोकांची चुकी नक्कीच नाही. आपण किंवा सरकारी यंत्रणेने त्याठिकाणी काही नोंदी दाखवल्या पाहिजे होत्या का? असा प्रश्न पडतो. भिडे वाडा फारच कमकुवत असल्याने आतमध्ये जाणे धोक्याचे आहे. त्यामुळे शाळांकडून बाहेरूनच माहिती सांगण्याचा प्रयत्न होत असतो.