भिगवण : भिगवण गावातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी लागणारी फिल्टर योजना ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित चालू करावी; अन्यथा शिवसेना आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.भिगवण गावाची अधिकृत लोकसंख्या १० हजारच्या आसपास आहे. मात्र, नोकरी आणि मुलांच्या शाळेसाठी भिगवणमध्ये वास्तव्य करणारांची संख्या १२ हजारांहून अधिक आहे. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. त्यामुळे नागरिकांत आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच स्वच्छ पाण्याची फिल्टर योजना लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली आहे. ही योजना बंद असल्याने परिसरात फिल्टर पाणी विकणाऱ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत. त्यांनी पाण्याचे दरही वाढविले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ते विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे नळाला येणारे पाणी पिण्यास योग्य नसतानादेखील पिणे भाग पडत आहे.भिगवणशेजारील तक्रारवाडी या छोट्या गावात राष्ट्रीय पेयजल योजनेतून स्वच्छ पाणी उपलब्ध होते. मात्र, भिगवणकर या जीवनावश्यक योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने विभागप्रमुख अजय भिसे, मौला मुलानी आणि पोपट लांडगे यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे.याबाबत भिगवण गावचे सरपंच पराग जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी भीमराव भागवत यांनी सांगितले की, भिगवण गावासाठी जिल्हा परिषद फंडातून ही योजना मंजूर झाली आहे. त्याचे कामही पूर्ण झाले असून वीजजोडही मिळाला आहे. पुढील चार दिवसांत गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यास सुरुवात होईल .(वार्ताहर)
भिगवणकरांना मिळेना स्वच्छ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2015 12:39 AM