भिगवण येथे कोविड सेंटर मध्ये १०० च्या वर बिगर लक्षणी रुग्ण उपचार घेत आहेत. तर आठ दिवसापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत १५ ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात आली. मात्र आठ दिवस होवूनही या ऑक्सिजन बेड मध्ये सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी नियुक्ती असणाऱ्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी २ जणच सेवा देत आहेत. तर या कोविड सेंटर मध्ये फिजीशिअन डॉक्टरची नियुक्ती झाली नसल्यामुळे अति गंभीर रुग्णांना उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. तर या कोविड सेंटर मध्ये आवश्यक असणारी रेमडेसिविर इंजेक्शन तसेच फेबी फ्ल्यू गोळ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन बाबत तालुका आरोग्य सुनील गावडे यांना विचारणा केली असता त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन ची मागणी उपजिल्हा आरोग्य अधिकारी चंदनशिवे यांच्या आदेशाने जात असल्याचे सांगितले. याबाबत बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना संपर्क साधला असता इंदापूर उपजिल्हा आरोग्य केंद्रासाठी इंजेक्शन पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती दिली. तर भिगवणला याच ठिकाणाहून इंजेक्शन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आवश्यक डॉक्टर आणि सुविधांचा वणवा असताना आणि इंजेक्शन आणि गोळ्यांचा पुरवठा नियमित होत नसताना ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने करण्याची गरज होती का असा प्रश्न निर्माण होत आहे.
याबाबत अनेक वेळा प्रयत्न करूनही उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चंदनशिवे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.