याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, इरिगेशन कॉलनी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. मयत महेश याची अकोले या ठिकाणी सासरवाडी असून, रक्षाबंधनासाठी तो पत्नीसह अकोलेगावी आला होता. सोमवारी रात्री देवदर्शनाला जातो, असे सांगून निघालेला महेश संध्याकाळी घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी अकोले-भादलवाडी गावाच्या शिवेवर असणाऱ्या नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या डम्पिंग दगडामध्ये कामगारांना त्याचा मृतदेह आढळून आला. मयत महेशचा गळा धारदार शस्त्राने चिरून त्याचा खून करण्यात आल्याचे घटनास्थळी दिसून आले आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवर गुन्ह्याची नोंद करीत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
भिगवण पोलीसहद्दीत झालेल्या या खुनाच्या तपासासाठी बारामती विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देत माहिती घेतली.