पुणे : भीमा काेरेगाव येथे गेल्या वर्षी 1 जानेवारी राेजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संभीजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या 5 जिल्ह्यात जिल्हाबंदी करुन पाेलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रही पुणे पाेलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.
भीम आर्मीचे पुणे जिल्हाप्रमुख दत्ता पाेळ म्हणाले, भीमा काेरेगाव येथे गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराचे मुख्य सुत्रधार मनाेहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबाेटे हे आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिडे आणि एकबाेटे यांना पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदी करावी. तसेच त्यांच्यावर पाेलिसांनी नजर ठेवावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान 30 डिसेंबर राेजी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची पुण्यात भीमा काेरेगाव संघर्ष परिषद हाेणार आहे. या परिषदेला अद्याप पाेलिसांनी परवानगी दिलेली नाही. याबाबत पाेलिसांशी सकारात्मक चर्चा झाली असून पुढील दाेन दिवसात सभेच्या परवानगीची पूर्तता केली जाईल असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
भीम काेरेगाव शाैर्य दिनाला मागच्या वर्षी 200 वर्षे पुर्ण झाल्याने लाखाे आंबेडकरी अनुयायी भीम काेरेगाव येथील विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी आले हाेते. त्यांच्यावर काही गटांकडून हल्ला करण्यात आला हाेता. त्यात माेठ्याप्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले हाेते. तसेच एका तरुणाचा जीव गेला हाेता. या प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले हाेते. मिलिंद एकबाेटे यांना याप्रकरणी अटक झाली हाेती. सध्या एकबाेटे हे जामीनावर बाहेर आहेत.