पुणे :जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पुण्यात भीम आर्मी संघटनेने अर्धनग्न होऊन आंदोलन केले. शहरातील पुणे स्टेशन भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधान झिंदाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीत याच विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरु असलेल्या जामिया विद्यापीठात हिंसाचार उसळला आहे. त्या विरोधात आता देशभर विविध आंदोलनं सुरु झाली आहेत.
यावेळी पुणे भीम आर्मीचे दत्ता पोळ म्हणाले की, ' विधेयक घटनाबाह्य आणि घटनाविरोधी आहेत. हे पाशवी बहुमतवर आणलेले विधायक आहे. हे जामिया विद्यापीठामध्ये विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून, आदेशावरून ज्या पद्धतीने पोलिसांनी हल्ले केले ते अत्यंत चुकीचे आहे. ही पंतप्रधान मोदी आणि शहा यांची हुकूमशाही वृत्ती आहे त्याचा निषेध म्हणून अर्धनग्न आंदोलन करत आहोत.