पुणे : दरवर्षी एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून दहा ते बारा लाखांचा जनसमुदाय येत असतो. 2018 मध्ये याठिकाणी हिंसा झाली होती. यंदा या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना न घडण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 71 जणांवर कोरेगाव भीमा, सणसवाडीसह वढु बुद्रुक या गावांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांनी ही माहिती दिली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून या परिसरात 71 जणांवर प्रतिबंधात्मक बंदीच्या नोटीसा काढल्या आहेत. यामध्ये मिलिंद एकबोटेंचेही नाव आहे. सोशल मीडिया वर खोट्या अफवा पसरविणे, जातीय भावना दुखावणे अशावर कार्यवाही करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
1 जानेवारीला हा कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे या भागाची रोज पाहणी करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास ९८६०२७२१२३ व ०२१३७२८६३३३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच जयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्यात येतील, असे सांगून जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायम स्वरुपी पथदिवे बसविण्याचे काम लवकरच पुर्ण होईल. याबरोबरच मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येणार आहे.