पुणे : काेरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी 1 जानेवारी राेजी झालेल्या जातीय दंगलीच्या जखमा अजूनही भरल्या नसल्याने तसेच या दंगलीची पुनरावृत्ती हाेऊ नये यासाठी पाेलीस प्रशासनाबराेबर जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच काेणीही कार्यक्रमात व्यत्यय आणू नये यासाठी हा संपूर्ण परिसर कॅमेरांच्या निगराणीखाली असणार आहे. त्याचबराेबर पाेलिसांकडून छुप्या कॅमेरांचा देखील वापर करण्यात येणार असून त्याद्वारे अनुचित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यंदा काेरेगाव भीमा शाैर्यदिन शांततेत पार पडावा यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. माेठी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययाेजनांची माहिती काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम आणि पुणे ग्रामीण पाेलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
असा असणार बदाेबस्त
- विजयस्तंभाचा परिसर हा 500 सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून निगराणीखाली असणार आहे. त्याचबराेबर 40 व्हीडीओ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणांचे चित्रीकरण येणार आहे.
- यंदा पहिल्यांदाच 12 ड्राेन कॅमेरांचा देखील वापर करण्यात येणार आहे. यातील 6 ड्राेन कॅमेरे हे हवेली भागात आणि 6 ड्राेन कॅमेरे शिरुर भागाची निगराणी करणार आहेत. त्याचबराेबर यंदा 50 हेल्मेट कॅमेरे आणि 50 छुप्या पेनामध्ये लावण्यात येणाऱ्या कॅमेरांचा देखील वापर निगराणीसाठी करण्यात येणार आहे. - ज्यांचा शांतता भंग केल्याचा इतिहास आहे आणि जे दंगलीमध्ये प्रत्यक्ष , अप्रत्यतक्षरित्या सहभागी हाेते अशा 1211 लाेकांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 15 नाेव्हेंबरपासून साेशल मिडीयावर लक्ष ठेवून 45 जणांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.
- अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या साेयिसाठी 35 हेल्प डेस्क असणार.
- 25 रुग्णवाहिका, 5 कार्डीयाक रुग्णवाहिका डाॅक्टरांच्या टीम साेबत तैनात असणार. 200 वाॅटर टॅंकर, 300 स्वच्छता गृहे, 23 फायर ब्रिगेडच्या गाड्या, 16 क्रेन तैनात असणार. त्यातबराेबर 270 फायर बलूनचा सुद्धा वापर करण्यात येणार. जवळच्या रुग्णालयातील 10 टक्के बेड आरक्षित करण्यात आले आहेत.
- चारचाकी आणि दुचाकीसाठी 50 हजार क्षमात असणारी 11 वाहनतळे. त्याचबराेबर वाहतळ ते विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 200 शटल बसेसची व्यवस्था. - खबरदारी म्हणून 1 जानेवारीला परिसरातील वीज प्रवाह खंडीत करण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील इंटरनेट सेवा बंद असणार आहे.
वाहतूकीतील बदलपाेलीस प्रशासनाकडून कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांच्या साेयीसाठी 31 -12-2018 राेजी रात्री 10 वाजल्यापासून ते 1-1-2019 राेजी रात्री 12 वाजेपर्यंत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
- अहमदनगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने ही शिक्रापूर येथून चाकणकडे वळविण्यात येणार आहेत.
- अहमदनगरकडून हडपसरकडे येणारी वाहने ही शिक्रापूर- तळेगांव ढमढेरे- न्हावरा- केडगांव चाैफुला- साेलापूर हायवे मार्गे हडपसरकडे वळविण्यात येणार आहेत.
- पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही चाकण मार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर- साेलापूर हायवे, केडगांव चाैफुला मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहेत.