पुणे - कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला, त्यावेळी परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त या पदावर होत्या, असे ॲड. आशिष सातपुते यांनी म्हटले होते. आता, याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीला बोलविण्यात येणार आहे.
चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची शुक्रवारी तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या चौकशीबाबत माहिती देताना रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं. तर, आजच्या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील अॅड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशीकामी साक्ष नोंदवण्यास बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे, याप्रकरणी त्यांची साक्ष महत्त्वाची असल्याने त्यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.
पुण्यात '1 जानेवारी 2018 रोजी जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे अशी मागणी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी अर्जाद्वारे केली आहे. त्यावर, आयोगाने विश्वास नांगरे पाटील यांचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले' आहेत.
दरम्यान, यापूर्वी सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना (Koregaon Bhima Inquiry Commission) आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परामबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात आली.
परमबीरसिंग, रश्मी शुक्लांनंतर नांगरे पाटील
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचार घटना घडली. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची गोपनीय माहिती तसेच इतर कागदपत्रे सादर केलेली होती. त्याअनुषंगाने त्यांची आयोगासमोर साक्ष घेणे आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या पुण्याचे तत्कालीन आयुक्त असल्याने त्यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण माहिती असू शकते. त्यामुळे या दोघांना चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावावे, अशी मागणी सातपुते यांनी मागणी केली होती. आता, विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे.