आगामी गळीत हंगामामध्ये भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले. पाटस तालुका दौंड येथे भीमा पाटस कारखान्याच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर सभा ऑनलाइन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी राहुल कुल होते. कुल म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून राजकारणविरहित कारखान्याचे कामकाज चालविण्याचे प्रयत्न आहेत. १५० कोटी थकीत कर्ज व १६०० कामगारांचा पगार यामधून वाटचालीस सुरुवात केली. त्यामुळे कारखाना अडचणीत आला. गेली दोन हंगाम कारखाना बंद आहे. कारखाना चालू ठेवला असता तर कर्जाचा बोजा आणखी वाढला असता. कारखाना चालू करण्यासाठी गेली दोन वर्षांपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न चालू आहेत. याकामी सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य मिळत आहे. भविष्यात निश्चितच कारखाना सुरू करण्यावरती भर राहील. या वेळी सभासद वसंत साळुंखे, प्राध्यापक अनिल शितोळे, अतुल ताकवणे, लक्ष्मण रांधवण यांनी प्रश्न विचारले. या प्रश्नाला अध्यक्ष कुल यांनी उत्तरे दिली. सभेच्या सुरुवातीस भीमा पाटसचे विद्यमान संचालक विनोद गाढवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवालवाचन व विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी केले. सूत्रसंचालन भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनी केले. आभार तुकाराम ताकवणे यांनी मानले. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, अरुण भागवत, आप्पासाहेब हंडाळ, आबासाहेब खळदकर, चंद्रकांत नातू, माणिक कांबळे, तुकाराम अवचर, महेश शितोळे, एम. डी. फरगडे, बाळासाहेब तोंडे पाटील आदी संचालक मंडळ उपस्थित होते.
पाटस येथे भीमा पाटस कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष राहुल कुल, उपाध्यक्ष नामदेव बावरकर, आबासाहेब निबे व संचालक मंडळ.