यवत : ‘‘केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगासाठी अनुकूल निर्णय घेतले असल्याने भीमा-पाटस कारखाना यंदाच्या गळीत हंगामात निश्चितच सर्व अडीअडचणींमधून बाहेर येईल,’’ असा विश्वास भीमा-पाटस कारखान्याचे अध्यक्ष व दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.
कारखान्याची ३६वी सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात झाली. विविध वृत्तपत्रांमधून भीमा-पाटस कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या प्रमुख विरोधकांनी सर्वसाधारण सभेला गैरहजेरी लावल्याने गोंधळ न होता सर्वसाधारण सभेसमोरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने कारखान्याचे सभासद उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक आबासाहेब निभे, सुरेश शेळके, विकास शेलार, अरुण भागवत, तुकाराम ताकवणे, भाजपाचे वासुदेव काळे, तानाजी दिवेकर, गणेश आखाडे, तात्यासाहेब ताम्हाणे, रवींद्र दोरगे, अरविंद गायकवाड, अशोक फरगडे, निळकंठ शितोळे, सर्जेराव जेधे, नितीन म्हेत्रे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब निभे यांनी अहवालवाचन केले. राहुल कुल यांनी प्रास्ताविक केले. यानंतर अध्यक्ष राहुल कुल यांना राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तसेच केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगासाठी अनुकूल निर्णय घेतल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठरावदेखील या वेळी घेण्यात आले. सर्वसाधारण सभेत विविध सभासदांकडून दिवाळीत सवलतीच्या दरात साखर देण्याची मागणी करण्यात आली. मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला २,६०० रुपयांप्रमाणे दर दिला जावा अशा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.तानाजी दिवेकर यांनी भीमा शैक्षणिक न्यास म्हणजे नेमकी संलग्न संस्था की वेगळी, असे विचारले असता कुल यांनी भीमा शैक्षणिक न्यास ही कारखान्याची संलग्न संस्था असून कारखान्याचे जे संचालक मंडळ असेल तेच न्यासाचा कारभार चालवेल, असे सांगितल्यानंतर दिवेकर यांनी सर्वसाधारण सभेत जाहीररीत्या खुलासा केल्याचे लक्षात ठेवा, असे सांगितले. दिवेकर यांच्या कोटीवर आमदार कुल यांनी ‘हवे तर तसे लेटर पॅडवर लिहून देतो,’ असे म्हटले.