आमदार राहुल कुल यांच्या सततच्या दिल्लीवारीने दौंड कराच्या भीमा पाटस कारखाना सुरू होण्याबाबतच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल हे भीमा पाटसचे चेअरमन आहेत. गेली १० महिन्यांपासून आमदार कुल आठवड्यातून किमान एकदा तरी दिल्ली किंवा मुंबईच्या दौऱ्यावर असलेले पाहायला मिळतात. नुकतीच आमदार कुल यांनी नवीन सहकारमंत्री अमित शहा यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेतली. वरवर अमित शहा यांच्या निवडीबद्दलचा सत्कार वाटत असला तरी या भेटीमागे भीमा पाटसचे गणित असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. गेली २ वर्षांपासून बंद पडलेला भीमा पाटस कारखाना चालू करायचा यासंदर्भात कुल प्रयत्नशील आहेत. तालुक्यांमध्ये होणारे विविध भाषणांमध्ये लवकरच भीमा पाटस कारखाना संदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असे कुल वारंवार सांगत आहेत. यासंदर्भात कुल हे तालुक्यातील विकासकामांबरोबरच भीमा पाटस सुरू करण्याबाबत आपला बराचसा वेळ खर्ची घालत आहेत. कारखाना सुरू होण्यापूर्वी बँकांची देणी या एकमेव विषयावरती भीमा पाटसच्या हालचाली सध्या केंद्रभूत झाल्या आहेत. आमदार कुल यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणाऱ्या सौख्यामुळे लवकरच दौंडकरांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल या प्रतीक्षेत दौंडकर आहेत. आतापर्यंत कुल रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलमंत्री गजेंद्र सिंह, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना भेटले आहेत. प्रत्येक भेटीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश असतो. भीमा पाटस व्यतिरिक्त तालुक्यातील रस्ते ,पाणी, रेल्वे , शेतीविकास यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणणे कुल यांना शक्य होत आहे. गेल्या दोन वर्षापासून भीमा पाटस कारखाना बंद असल्याने तालुक्यातील खाजगी कारखाने एफआरपीबाबत शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे भीमा पाटस कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भीमा पाटस कारखाना सुरू होण्याच्या अपेक्षा उंचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:08 AM