पाटेठाण : गेल्या महिनाभरापासून दौंड तालुक्यात बेकायदा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल प्रशासनातर्फे कारवाई सुरू आहे. मात्र, याला न घाबरता माफियांकडून उपसा सुरूच आहे. येथील पानवली भीमा नदीपात्रात उपसा सुरू असून नदीपात्र पाखरले आहे.विशेष म्हणजे हा उपसा शिरूर तालुक्यातील वाळूमाफिया करीत आहेत. याचा येथील स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्यावर कारवाई करून उपसा तातडीने बंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. पानवली गावाच्या नदीपात्राच्या पल्याड तसेच परिसरातील इतर गावांतील नदीच्या काठी यंत्राच्या साह्याने उपसा सुरू आहे. जेसीबी मशीनच्या साह्याने नदीपात्रात मोठे-मोठे खड्डे केले आहे. नदीचे पात्र बदलण्याचा धोका तसेच परिणामी पुराच्या कालवधीत नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसण्याची परिस्थिती झाली आहे.शिरूर तालुक्यातील अरणगाव, आलेगाव पागा या नदीकाठी असलेल्या गावांच्या जंगलातून वाळूची वाहतूक करण्यासाठी बेसुमार जंगलतोड करत रस्ते बनविण्यात आले आहेत. महसूल विभागाने या वाळूमाफियांवर अनेकदा कारवाई करूनही उपसा अहोरात्र सुरूच आहे. अनेकदा मशीन यंत्रे पेटवूनदेखील हा प्रकार सुरूच आहे. कारवाईच्या सूचना या संदर्भात आमदार राहुल कुल म्हणाले, की दौंड तालुक्यात भीमा आणि मुळा-मुठा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. तसेच शिरूर तालुक्यातील काही माफिया वाळूउपसा करीत असतील, तर या संदर्भात शिरूरचे तहसीलदार आणि तेथील लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करावयाच्या सूचना दिल्या जातील.
भीमा नदीपात्र माफियांनी पोखरले
By admin | Published: January 02, 2015 11:18 PM