राजगुरुनगर : भीमा नदीच्या पात्रात थेट मिसळणारे मैलामिश्रित पाणी, घनकचरा, नदीपात्रात थेट मिसळणारे सांडपाणी, जलपर्णी यांमुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भीमा नदी याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. भीमा नदीकाठी असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून पुरवठा होणारे दूषित पाणी पाहता गावांचे आरोग्यही दूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता कुकडी, मीना, घोड, भीमा, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा या मोठ्या नद्या आहेत. या नद्यांच्या पात्राकडे लक्ष टाकल्यास विदारक चित्र समोर दिसते. जलपर्णी आणि तत्सम वनस्पतींनी व्यापलेले पात्र, नदीकाठावर उभे राहिल्यास अनुभवावयास येणारी दुर्गंधी आणि वाहणारे काळे पाणी! नद्यांचे हे विदारक रूप सध्याचे वास्तव आहे. या नद्या पाणी नव्हे, तर विष वाहून नेत असल्याचे दिसते. नदीत मिसळणाऱ्या या विषयुक्त पाण्यामुळे नद्यांमधील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वापुढे धोका निर्माण झाला आहे. नद्यांची पात्रे जलपर्णीच्या मगरमिठीत अडकली आहेत.
वास्तविक नदी प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे त्यातून सांडपाणी व कचºयावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रसंगी प्रदूषणास कारणीभूत ठरणाºया घटकांवर कडक कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात चालणारी नदी बचाव मोहीम, नदी महोत्सव हाती घेऊन नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवणे गरजेचे बनले आहे. अन्यथा विष वाहून नेणाºया नद्या नागरिकांच्या आरोग्यापुढे जटिल समस्या होणार, असे चित्र सध्याचे आहे.भीमा नदी सध्या अतिशय मरणासन्न अवस्थेत आहे. अशा नद्या पाणी नव्हे, तर विष वाहून नेत आहेत. या विषयुक्त नद्यांनी आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
अनेक गावांच्या पाणी योजना नदीवरून आहेत. मुळात नद्यांचे दूषित पाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांचा अभाव यांमुळे दूषित पाण्याचाच पुरवठा होत आहे.नागरिकांमधील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेपर्वाई यांमुळे नदी प्रदूषण अधिक गतीने होत आहे.नद्यांमध्ये थेट टाकण्यात येणारा कचरा आणि थेट सोडण्यात येणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी यांमुळे नद्यांची वाईट अवस्था झाली आहे.