दावडी (पुणे) : पूजा करण्याच्या कारणावरून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथील मंदिरात देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकारावरून दोन्ही बाजूंच्या ३६ पुजाऱ्यांवर खेडपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शंकर गंगाराम कौदरे (रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांविरोधात, तर गोरक्ष यशवंत कौदरे (रा. भीमाशंकर, ता. खेड) यांच्या तक्रारीवरून विरोधी गटातील १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमाशंकर मंदिर गाभारा तसेच परिसरात असलेल्या शनिमंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी (दि. १६) दुपारी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असताना हा वाद व हाणामारीचा प्रकार घडला. एका गटाने जमावाने येऊन गाभाऱ्यात पूजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवून येथील ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. काठ्या आणि लोखंडी पाइप तसेच खुर्च्या एकमेकांना फेकून मारण्यात आल्या.
या प्रकारावरून दोन्ही बाजूंच्या ३६ पुजाऱ्यांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या आवारात पोलिस उपस्थित असतानाही हा प्रकार घडला आहे. या वादावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.