भीमाशंकर : अभयारण्यामध्ये भेकर जातीचा वन्यप्राणी मारल्याप्रकरणी तिघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील रामा शांताराम कोकरे याला अटक करण्यात आली आहे तर दोनजण फरार असून, त्यांचा तपास सुरू असल्याचे भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.
अभयारण्यातील भोरगिरी क्षेत्रात रामा शांताराम कोकरे (रा. भीमाशंकर ता. खेड) व त्याच्या साथीदारांनी भेकर जातीचा वन्यप्राणी मारला व त्याचे संबंधित फोटो सोशल मीडियावर टाकले. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी यांना कळताच त्यांनी रामा कोकरे याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी वन्यजीव संरक्षण वन अधिनियमान्वये संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार असलेल्या दोघांचा शोध घेणे चालू आहे. ही कारवाई वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी केली.
या गुन्ह्याच्या तपास कामी वन कर्मचारी नारायण गिऱ्हे, एस. वी. होले, एस. एस. लवंगे, ए. ए. भालेकर, एस. एस. ससाने, आर. एन. मुरुडकर, के. एस. नायकोडी, व्ही. डी. निर्मळ, एम. आर. बनसोडे, व्ही. डी. तांबारे यांनी विशेष परिश्रम घेतले. अभयारण्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने प्राण्यांना इजा केली अथवा मारल्याचे निदर्शनास आले तर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.