भीमाशंकर: कोरोना या जागतिक महामारीमध्ये लागू केलेले निर्बंध अशंत: शिथील केले आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारच्या पर्यटनास परवानगी दिलेली नाही. तरी भीमाशंकर कडे येणा-या पर्यटकांनी अभयारण्यातील धबधबे, कोकणकडे, निसर्गपायवाटा, जंगल भ्रमंती यासाठी येवू नये. जंगलात विना परवानगी कोणी फिरताना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा ईशारा वन्यजिव विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक दिलीप भुर्के यांनी दिला आहे.
राज्य शासनाने कोरोना निर्बंधात थोडी सूट दिल्या बरोबर लोक मोठया संख्येने घरातून बाहेर पडू लागले आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने पर्यटनस्थळांकडे मोठया संख्येने जात आहेत. शासनाने पर्यटनस्थळे धार्मिकस्थळे घडण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही लोक भीमाशंकर, माळशेज, हरिश्चंद्र गड, लोणावळा खंडाळा, ताम्हीणी घाट, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणी वर्षा विहारासाठी जातात. अशा पर्यटकांच्या लोंढेच्या लोंढे या ठिकाणी दिसू लागले आहेत. यातून कोरोना महामारीचा धोका आहेच तसेच या पर्यटनस्थळांवर धोकादायक पध्दतीने फिरून लोक आपला जिव धोक्यात घालत आहेत.
भीमाशंकरला धबधब्यातून पडलेला तरुण अजूनही बेपत्ता
शिक्रापुर येथील लक्ष्मण लहारे हा २९ वर्षाचा युवक आपल्या मित्रांसोबत भीमाशंकर जंगलात फिरायला गेला. कोणताही अंदाज नसताना कोंढवळच्या धबधब्यात उतरला व येथे पाय घासरून पडला. या घटनेला सहा दिवस झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी एनडिआरएफ, पोलिस, वन विभाग, स्थानिक ग्रामस्थ व इतर काही सेवाभावी संस्था यांनी भरपुर प्रयत्न केले. मात्र त्याचा अजूनही तपास लागला नाही.
पर्यटनस्थळांवर फिरण्याची परवानगी नसताना अशा प्रकारे कोंढवळच्या धबधब्यात उतरून या तरूणाने प्रशासना, स्थानिक ग्रामस्थांबरोबर व आपल्या कुटूंबीयांना देखील दु:खात लोटले. हि घटना घडल्यानंतर वन्यजिव विभागाने भीमाशंकर जंगलातील प्रेक्षणीय ठिकाणी फलक लावून जंगलातील सर्व वाटा बंद केल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी नेमूण जंगलात फिरणा-या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भीमाशंकरचे मंदिर देखिल बंद आहे. तरी कोणीही भीमाशंकरकडे येऊ नये असे अवाहन दिलीप भुर्के यांनी केले आहे.