भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सन २०१७च्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. दर्शनरांग पायऱ्यांच्या वरपर्यंत आली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी काम करत होते, मात्र पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, दर्शनासाठी लांबपर्यंत रांगा, मंदिराजवळ गर्दी झाली होती.सध्या शाळेच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने भीमाशंकरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शन व पर्यटन अशा दोन्ही गोष्टी भीमाशंकरमध्ये साध्य होत असल्याने पुणे, मुंबई, नाशिककडील पर्यटकांचा लोंढा भीमाशंकरकडे जास्त होता. त्यात १ जानेवारी २०१७च्या पहिल्या दिवशी भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली. सकाळी गर्दी होती. मात्र ११ नंतर दर्शनरांग लांबपर्यंत पोहोचली. निगडाळे ते भीमाशंकर हा रस्ता छोटा असल्याने वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या. तसेच मंदिराजवळ येऊन कळस दर्शन घेण्यासाठीदेखील गर्दी झाली, हॉटेल्स भरून गेली होती. भीमाशंकरमध्ये मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील डिंभे, घोडेगाव, मंचर तसेच राजगुरुनगर भीमाशंकर रस्त्यावरील खेड, वाडा, चासकमान या गावांमध्येही वाहतूककोंडी झाली होती. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी नेमून वाहनतळ सुरू केले, दर्शनरांगेत पोलीस कर्मचारी नेमून रांग व्यवस्थित केली.
हजारो पर्यटकांमुळे भीमाशंकर ‘फुल्ल’
By admin | Published: January 02, 2017 2:09 AM