अवसरी बुद्रुक : साखर उद्योगात स्पर्धा वाढली आहे. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी व कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उभारणी, तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्प विस्तारीकरण करणार असल्याचे प्रतिपादन भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या व दत्तात्रय ऊसतोडणी वाहतूक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बाेलत होते. ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, पूर्वा वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
वळसे-पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर जाहीर केला; परंतु मध्यंतरीच्या काळात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी असल्याने साखरेची विक्री झाली नाही. त्यामुळे गोडाऊनमध्ये साखर पडून राहिल्याने बँकेच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढतच गेला. परिणामी बऱ्याच साखर कारखान्यांना तोट्यात साखर विक्री करावी लागली. सद्य:स्थितीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेस चांगला भाव मिळत असल्याने विक्री होत आहे. पुढील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा पुरवठा करणाऱ्या ब्राझील देशात दुष्काळी परिस्थिती असल्याने, तसेच केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यास परवानगी दिल्याने इथेनॉलनिर्मितीत वाढ होऊन साखरेचे उत्पादन कमी झाल्यास आंतरराष्ट्रीयबरोबरच देशांतर्गत बाजारात साखरेचा दर चांगला राहील.
बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कोरोना काळातही कारखान्याने उच्चांकी ९ लाख ६९ हजार ९२० मे. टन गाळप करून १० लाख ९१ हजार ५३८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ११.२४ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
सहवीजनिर्मिती प्रकल्पामार्फत ७ कोटी १३ लाख ६९ हजार युनिटचे उत्पादन होऊन कारखानावापर वजा जाता ४ कोटी १६ लाख ४ हजार युनिट वीज वितरण कंपनीस निर्यात केली आहे. कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. व्हाइस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
२६ अवसरी
भीमाशंकर कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना दिलीप वळसे-पाटील.