अवसरी (पुणे) :भीमाशंकर कारखान्याकडून उसाचा अंतिम दर ३ हजार १०० रुपये देण्यात येणार आहे. पुढील हंगामात कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात असलेला भाव आपण त्यांना देऊ, असे कारखान्याचे संस्थापक व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे आयोजित वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, मानसिंग भैया पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे वसंतराव भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, शिवाजीराव ढोबळे, शिवाजीराव लोंढे, प्रकाश घोलप, दौलत भाई लोखंडे, राजेंद्र गावडे, प्रकाश पवार, सुभाष मोरमारे, वसंतराव भालेराव, राजेंद्र देशमुख यासह संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते.
वळसे-पाटील म्हणाले, सोमेश्वर माळेगाव कारखान्यांनी जो दर दिला तो दर आपल्याला देता येणार नाही. इतर कारखान्यांशी आपली तुलना करणे योग्य नाही माळेगाव कारखान्याकडे इथेनॉल प्रकल्प असल्याने त्यांचे उत्पन्न जास्त आहे. माळेगाव, सोमेश्वर कारखाना सभासदांना वेगळा दर देतात तर बाहेरून ऊस घेऊन येणाऱ्यांना वेगळा दर देत असतात. मात्र भीमाशंकर सर्वांना एकच दर देतो. भीमाशंकर कारखान्यात पुढील काही दिवसात इथेनॉल प्रकल्प सुरू झाल्यास कारखान्याचे उत्पन्नात वाढ होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मनात असलेला दर आपल्याला देता येणार आहे. या पूर्वी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा उसाचा दर जादा दिल्यास वरील उत्पन्न हे कारखान्याचे समजून कारखान्यांना त्या रकमेचा इन्कम टॅक्स भरावा लागत होता. मात्र आता केंद्र शासनाने इन्कम टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे भविष्यात जादा दर देताना अडचण येणार नाही.
बाळासाहेब बेंडे म्हणाले, शेतकऱ्याचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, ठिबक सिंचन, माती परीक्षण, पाणी परीक्षण, खते, ऊस बियाणे, पाचट कुटी यासारखे विविध विषयांवर दत्तात्रय विकास ऊस वाढ प्रकल्प माध्यमातून मार्गदर्शन केले जात असून कारखान्याचे ऊस तोडणी कार्यक्रम हे शिस्तबद्ध आहेत. कारखाना उत्तमरीत्या काम करत असून लेखा परीक्षण अहवालात कारखान्यास अ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे बेंडे पाटील यांनी सांगितले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी उसाला जास्तीत जास्त बाजार द्यावा, तसेच कारखान्याच्या वतीने इंजिनियरिंग कॉलेज सुरू करावे, ऊस उत्पादक सभासदांचा विमा उतरावा, अशी मागणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.