भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरावर खरा अधिकार हा आदिवासी समाजाचा आहे; परंतु हा समाज अत्यंत गरीब व मागास असल्यामुळे याचा गैर फायदा घेऊन पुजाऱ्यांनी ह्याचा कब्जा मिळवला आता हे आता पैशावरून एकमेकांशी भांडू लागले आहेत. आदिवासी समाजाने भीमाशंकर येथे घडलेल्या या घटनेचा निषेध करत पुन्हा भीमाशंकरवर आमचा हक्क मिळावा यासाठी मोर्चा काढला.
सोमवार दि.१६ रोजी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यामध्ये गुरव समाजाच्या दोन गटात हाणामाऱ्या झाल्या याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या घटनेमुळे भीमाशंकर व ह्या आदिवासी भागाची बदनामी झाली ह्या घटनेच्या निषेधार्थ तसेच भीमाशंकर मंदिराचा ताबा पुन्हा आदिवासी समाजाला मिळावा व इतर मागण्यांसाठी सर्व आदिवासी संघटना व तमाम आदिवासी समाजाच्या वतीने म्हातारबाचीवाडी ते भीमाशंकर असा पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
सकाळी १० वाजता म्हातारबाचीवाडी येथे मोर्चाला सुरुवात झाली. भीमाशंकर येथे पोहोचल्यानंतर काही प्रमुख कार्यकर्ते व महिलांनी शंकराच्या पिंडीवर जलअभिषेक केला या नंतर बैठकीस सुरुवात झाली, शंकर मोहंडुळे, निवृत्ती गवारी संजय केंगले, प्रवीण पारधी विठ्ठल वनघरे अशोक पेकारी एकनाथ तळपे विजय आढारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या वेळी आदिवासी जनतेचे नेते सुभाषराव मोरमारे, प्रवीण पारधी, शंकर मोहंडुळे, दत्तात्रय हिले, भीमाशंकर संघर्ष समितीचे अध्यक्ष विठ्ठल वनघरे, नामदेव कोळप, शांताराम लोहकरे, सखाराम गभाले, एकनाथ तळपे, संतोष सुपे, निवृत्ती गवारी, संजय केंगले, विजय आढारी, अशोक पेकारी, मारुती लोहकरे, संजय गवारी, व परिसराती आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी जय बिरसा जय राघोजी भीमाशंकरांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदिवासी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा फौज फाटा लावण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर व २०० पोलिस उपस्थित होते.
भीमाशंकर मंदिराच्या पहिल्या पायरीवर सभा झाली यावेळी मान्यवरांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला व भीमाशंकरवर पुन्हा आदिवासी समाजाचा हक्क प्रस्थापित व्हावा, मंदिरामध्ये हाणामारी केलेल्या ३६ जणांवर गुन्हा दाखल आहे. यांना जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मंदिरातून बाहेर ठेवण्यात यावे अशा आशयाचे लेखी निवेदन खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील व आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांना दिले.
भीमाशंकर हे आदिवासी समाजाचं दैवत असून त्याची पूजा अर्चा करण्याचा मान हा आदिवासींचा पूर्वांपार होता. असे असताना बलुत्यावर आलेल्या व्यक्तींनी आमच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कपट नीतीने फसवेगिरी करून आदिवासींचे मंदिर ताब्यात घेत महादेवाच्या श्रद्धेला, प्रतिष्ठेला काळिमा फासला आहे. या फसवेगिरीतून मंदिर मुक्त करण्यासाठी आता आम्ही आमचे अधिकार मागत आहोत. ते जर आम्हाला मागून मिळत नसतील तर आमच्या समाजाला बंडकरी जन्माला घालायचा इतिहास आहे. तोच इतिहास पुन्हा घडवणे आदिवासी समाजाला मुळीच अशक्य नाही.
- प्रवीण बुधाजी पारधी (अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा)