अवसरी : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६मध्ये गाळप केलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम बँकेत येत्या चार-पाच दिवसांत देणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत देय एफआरपी लवकर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भीमांशकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६मध्ये गाळप केलेल्या उसासाठी १,८०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे अॅडव्हान्स देण्यात आलेला आहे. गळीत हंगाम २०१५-१६साठी २,२१५.३५ रुपये प्रतिमेट्रिक टन निव्वळ एफआरपी येत असून, त्यांपैकी कारखान्याने केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्यात कोट्याप्रमाणे साखर निर्यात केलेली असल्याने ४५ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात परस्परवर्ग होणार आहे. एफआरपीच्या ८० टक्के १,८०० प्रतिमेट्रिक टन रक्क म वर्ग के लेली असल्याने संपूर्ण एफआरपी अदा करण्यासाठी ३७० रुपये प्रतिमेट्रिक टन देय राहतात. कारखान्याने दि. ३१ मार्च २०१६ पर्यंत गाळप के लेल्या ६,५२,९४० मेट्रिक टन उसासाठी १,८०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ११७ कोटी ५२ लाख ९३ हजार रुपये रक्कम ऊसउत्पादकांच्या खाती वर्ग केलेली आहे. तसेच, ३१ मार्च २०१६अखेर गाळप केलेल्या ६,५२,९४० मेट्रिक टन उसासाठी २०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे १३ कोटी ५ लाख ८८ हजार रुपये ऊसउत्पादकांच्या खाती वर्ग केली जाणार आहे. १ एप्रिल २०१६पासून गाळप होणाऱ्या उसाला एकत्रित २,००० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाणार असल्याची माहिती बेंडे यांनी दिली. (वार्ताहर)
‘भीमाशंकर’कडून एफआरपीची रक्कम मिळणार
By admin | Published: April 26, 2016 1:50 AM