भीमाशंकर : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील पाचही ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र व परिसराची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच राज्यातील प्राचीन मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यातील काही कामांना निधीची कमतरता होती ती भरून निघणार आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित कामांना चालना मिळणार असल्याने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले.
पूर्वीच्या भाजपा-शिवसेनेच्या सरकार काळात १४८ कोटींचा श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील निगडाले ते भीमाशंकर हा काँक्रिट रस्ता, कमलजामाता मंदिरासमोर सभामंडप, सुलभ शौचालय, बसस्थानक सुशोभीकरण ही कामे पूर्ण झाली आहेत. तर मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचे काम सुरू आहे. तसेच मंदिरापुढील सभामंडपाचे काम लवकरच पुरातत्व खात्याकडून सुरू होणार आहे. यातील काही कामांसाठी अंदाजे वीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या अर्थसंकल्पातून हा निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा भीमाशंकर देवस्थानला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेतली जातील व प्राचीन मंदिरांच्या जतन संवर्धनाची कामे हाती घेतली जातील असे सांगितले आहे. त्यामुळे हा आवश्यक असलेला निधी व पुढील कामांना भरघोस निधी या सरकारकडून मिळेल अशी अपेक्षा भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
आसाम सरकारने त्यांच्या राज्यात असलेले भीमाशंकर मंदिर हेच ज्योतिर्लिंग आहे असा दावा केल्याने मागील महिन्यात एक वाद निर्माण झाला होता. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर ज्योतिर्लिंगपेक्षा भीमाशंकरचा त्यांनी, भीमा नदी तिरी अत्यंत प्राचीन व जागृत असलेल्या व शिवपुराणात वर्णिलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग असा विशेष उल्लेख करत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच मूळ ज्योतिर्लिंग असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या भाषणातून केले.