भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दुस-या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. दर्शनरांग बसस्थानकापर्यंत पोहोचली होती. पाऊस, दाट धुके यामध्ये सुमारे चार ते पाच तास रांगेत उभे राहून भाविकांनी दर्शन घेतले.मात्र, मंचर ते भीमाशंकर व राजगुरुनगर ते तळेघर या रस्त्यावर येताना झालेल्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. खड्डे तत्काळ भरले जावेत, अशी मागणी भीमाशंकर देवस्थान टस्टच्या वतीने उपकार्यकारी विश्वस्त अॅड. सुरेश कौदरे यांनी केली.यावर्षी श्रावण महिन्यात सुरुवातीपासून भीमाशंकरकडे येणाºया पर्यटक, भाविकांचा मोठा ओघ आहे. श्रावणी सोमवारप्रमाणेच शनिवार, रविवार या सुट्यांच्या दिवशी प्रचंड गर्दी होत आहे.रविवार, सोमवारी दर्शन रांग सुमारे एक किलोमीटर लांबपर्यंत जाते. बसस्थानकापासून सुरू होणाºया दर्शन रांगेत उभे राहणाºया भाविकांचे सुमारे तीन ते चार तासांनंतर दर्शन होते. मंदिरातही एक मिनिटात सुमारे वीस ते पंचवीस भाविक दर्शन घेतात. भीमाशंकरमध्ये गाभाºयात शिवलिंगाला हात लावून दर्शन असल्याने भाविक भीमाशंकरकडे मोठ्या प्रमाणात येतात.बसस्थानक ते मंदिर या दर्शन रांगेत फक्त पायºयांवर अर्ध्यापर्यंत छत झाले असल्याने भाविकांना पावसात भिजावे लागते. हे छत शेवटपर्यंत व्हावे, अशी मागणी अनेक भाविकांनी केली; तसेच मुखदर्शन वपासद्वारे दर्शनाचे फलक बसस्थानकाजवळ लावावेत, अशीही मागणी केली.
भीमाशंकरला दीड लाख भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:08 AM