लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १०, ११, १२ मार्च रोजी होणारी महाशिवरात्र यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासन व देवस्थानने घेतला असून शिवभक्तांनी महाशिवरात्र आपल्या घरीच भगवान शंकराची पूजा करून साजरी करावी, असे अवाहन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आळंदी, पंढरपूरच्या यात्रादेखील रद्द करण्यात आल्या. तशीच १०, ११, १२ मार्च रोजी होणारी महाशिवरात्र यात्रादेखील रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व देवस्थानने घेतला आहे.
यावर्षी ११ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. यानिमीत्त तीन दिवस देशभरातून लोक मोठ्या संख्येने भीमाशंकरला पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तीन दिवस भीमाशंकरमध्ये मोठा बाजार भरातो. कोकणातून लोक पायी भीमाशंकरला येतात. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो या परिसरात कोरोनाची लाट येवू शकते. ही शक्यता विचारात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकट
कोरोनाचे सावट मागील काही दिवसांपासून वाढत असल्याने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे होणारी महाशिवरात्र यात्रा भरवू नये, असा निर्णय प्रशासन व देवस्थानने घेतला आहे. त्याप्रमाणे याचे कडक पालन केले जाणार आहे. यात्राकाळात तीन दिवस भीमाशंकरमध्ये जाण्यास पूर्ण बंदी असणार आहे. सगळ्या शिवभक्तांनी घरी भगवान शंकराची पूजा करावी, असे अवाहन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
27022021-ॅँङ्म-ि02 - श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर