पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला मतदारसंघाचा भाग येतो. या मतदारसंघातील प्रश्नाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत येऊन आयुक्त विक्रम कुमार यांच्या बरोबर बैठक घेतली. त्यानंतर अवघ्या तीन तासांतच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनीही आयुक्तांबरोबर बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनीही या मतदारसंघातील प्रश्न मांडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने प्रश्नाबाबत बैठक घेतल्यानंतर भाजप आमदाराने तातडीने बैठक घेऊन राजकीय कुरघाेडी केली आहे.
खासदार सुळे यांनी बाेलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे उपस्थित होते. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये विविध प्रश्न आहेत. त्यात रस्ता, पाणी याबाबतच्या तक्रारी जास्त आहेत. पाण्याचे नियोजन केले जात नाही. समाविष्ट गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे; पण अनेक टँकर व्यावसायिक जादा दर आकारत आहेत. त्याकडेही या बैठकीत सुळे यांनी लक्ष वेधले. खा. सुळे यांची बैठक संपल्यानंतर दुपारी तीन वाजता आमदार तापकीर यांनीही आयुक्तांबरोबर बैठक घेतल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.