कोरेगाव भिमा-भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आज २०५ व्या विजयदिनी विविध पक्ष , संघटना , व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर अलोट गर्दी केल्याने स्तंभ परिसरात भीमसागर लोटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यावेळी विविध पक्ष , सामाजीक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यावर्षी मानवंदनेसाठी येणा-या बांधवांची उत्तम व्यवस्था झाली असल्याने समाज बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले होते.
कोरेगाव भिमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज , महार रेजीमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजीमेंटच्या अनेक शुरविरांना वीरमरन आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.
पेरणे फाटा येथे काल मध्यरात्रीपासुनच मोठ्याप्रमाणावर मानवंदनेसाठी गर्दी करण्यात आली होती. आज दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने येथे रॅली काढीत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील नियोजित कार्यक्रमास कालपासूनच सुरवात झाली. आज सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. मानवंदनेसाठी आज आलेल्या प्रमुख मान्यवरात केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले , मंत्री दिपक केसरकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भीम आर्मिचे चंद्रशेखर आजाद , पीपल्स रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन सेना दलित कोब्रा, बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल,भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ, बुद्दिष्ट मुव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू आंबेडकर विचार मंच, भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आदींसह बार्टि व विविध संस्था व पदाधिर्कायांचा समावेश होता.
कोरेगाव भीमा व पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने फिरते शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे व पेरनेच्या सरपंच सरपंच उषा दशरथ वाळके यांनी सांगितले. यावेळी मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचे सर्जेराव वाघमारे व त्यांचे सहकारी उपस्थितांचे स्वागत करत दिवसभर ध्वनीक्षेपकावर नियोजन करण्यात येत होते.
पोलीसांचे चोख बंदोबस्त व नियोजनामुळे विजयस्तंभ परिसरात गर्दी एकवटु दिली नाही. पुणे व नगर बाजुकडुन येणा-या बांधवांसाठी तसेच व्हिआयपींना येण्याजाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्यामुळे विजयस्तंभ प्रवेशद्वाराजवळ गर्दी न होता नियोजन पध्दतीने अभिवादन सुरु होते. अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल , उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे , यांच्यासह बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये , समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे , बांधकाम विभागाचे मिलींद बारभाई यांनी योग्य समन्वय साधत सर्व आरोग्य , पाणी , वाहतुक यांचे योग्य नियोजन केल्याने मानवंदना देण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ दिली नाही.
वाहतुक कोंडी झाली नाही
वाहतुक कोंडी होवू नये, यासाठी पुणे-नगर रस्त्यावर चारही बाजूंनी येणारी वाहतूक पयार्यी मागार्ने वळविण्यात आली होती. तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी सुमारे ३६० बसेसची व्यवस्था करूनही या व्यवस्थेवर ताण आला. मात्र काहि वेळातच पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी योग्य नियोजन करित तात्काळ बसेसची संख्या वाढवून गर्दि आटोक्यात आणली.
या वर्षी प्रशासनाचे सुरेख नियोजन
ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गदीर्चे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या आठ मार्गिकांच्या व्यवस्थेमुळे नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही.