पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात मुंढवा जॅकवेलचे पाणी सोडल्यामुळे या पाण्याचा फायदा दौंड व शिरूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.काही दिवसांपासून तालुक्यातील मुळा, मुठा आणि भीमा या नद्यांचे पात्र कोरडे ठणठणीत पडले होते. त्यामुळे शेतकरी हवादिल झाला होता; परंतु मुंढवा जॅकवेलचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना त्याचा थोडाफार आधार मिळाला आहे. तरीदेखील दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरीवर्ग असल्याचे एकंदरीत चित्र आहे. तर दुसरीकडे, पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला असल्याची वस्तुस्थिती आहे. (वार्ताहर)पाण्यामुळे शेतकऱ्यांना फायदा कानगाव परिसरात पाण्याअभावी पिके जळून चालली होती. याप्रकरणी माजी आमदार अशोक पवार यांनी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे मुंढवा जॅकवेलचे पाणी भीमा नदीला सोडण्याची मागणी केली आणि त्यामुळे भीमा नदीपात्रात मुंढवा जॅकवेलच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला.परिणामी, दौंड तालुक्यातील कानगाव, शिरूर तालुक्यातील मांडवगण बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले असून, परिसरातील शेतकऱ्यांची पिके त्यामुळे वाचणार असल्याचे कानगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली शेळके यांनी सांगितले.
भीमा नदीपात्रात मुंढवा जॅकवेलचे पाणी
By admin | Published: June 14, 2016 4:40 AM