पुणे : कुटुंबातील कर्त्याच्याच आत्महत्येमुळे आयुष्यच अंधकारमय झाले. दिवाळीच्या काळात तरी या कुटुंबांना आधार द्यावा, यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील १७ कुटुंबांना दिवाळीसाठी पुण्यात आणण्यात आले आहे.नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील १७ कुटुंबांना या प्रकल्पांतर्गत आधार दिला जात आहे. सर्व कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलांना शालेय वस्तू, कपडे, शाळेची फी या सर्व गोष्टींचे आर्थिक साह्य केले जाते. कुटुंबातील मुलांना नांदेड भागातील आवडत्या शाळेत प्रवेश मिळवून देतात.दिवाळीची सुटी लागली की, अनेक मुले मामाच्या गावाला जाऊन सुटीचा आनंद घेतात. काहीजण बाहेरगावी फिरायला जातात. त्याचप्रमाणे या शेतकरी कुटुंबातील मुलांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पुण्यातील १४ कुटुंबांनी ही जबाबदारी घेतली आहे. पुण्यातील कल्याणीनगर, लोहगाव, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, कोथरूड, सोमवार पेठ, गणेश पेठ, धनकवडी या भागातील ही कुटुंबं आहेत. हे सर्व जण शेतकरी कुटुंबातील मुलांना स्वत:च्या घरी आणतात. जवळपास पंधरा दिवस सुटीचा आनंद या मुलांना मिळतो. सुटीत मुलांना कपडे घेऊन देणे, फराळ देणे, किल्ले तयार करण्यास मदत करणे, फिरायला घेऊन जाणे अशा प्रकारे सुटीचे पंधरा दिवस त्यांना आनंदित केले जाते. तसेच, या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना पुण्यात या दिवाळी सणाचा आनंद लुटता येतो. भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सागर पवार, सुनीत परदेशी, मनोज रानडे, राधिका मखमले, कल्पना उनवणे, संगीता चौरे, अनिता पोटे, सुजाता कोतवाल, माधुरी जाधव, अजय शिंदे, वर्षा साबळे, राजेश जाधव, अजय बल्लाळ, मानसी रानडे या कुटुंबांमध्ये सध्या अर्धापुरातील आत्महत्याग्रस्त कुटुंबं दिवाळी साजरी करीत आहेत.मुन्नी मांजरे यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वत:ची शेती असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर चुलते ही शेती सांभाळत आहेत. तसेच, पतीचे वडील आणि भाऊ कुटुंबाकडे लक्ष देतात.मंगल इंगोले यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वत:ची अर्धा एकर शेती होती. त्या सध्या माहेरी राहत आहेत.सुनीता कदम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पतीच्या एक एकर शेतीचा कारभार पतीचे भाऊ पाहतात.लक्ष्मी क्षीरसागर चार मुले आहेत. त्यांनी आपल्या पतीनंतर, एक एकर शेती इतर लोकांना पाहण्यासाठी दिली आहे.लक्ष्मी साखरे यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांची शेती सासू-सासरे पाहतात, तर त्या माहेरी राहत आहेत.वर्षा इंगोले यांना दोन मुले असून, त्यांचे शेतीवरच घर चालते.पुष्पा कदम यांना दोन मुली आहेत. त्यांची दीड एकर शेती त्यांचे चुलते करीत आहेत.सरस्वती कदम यांना तीन मुली आहेत. त्यांची शेती सासरे पाहतात.विजयमाला देशमुख यांना दोन मुलं आहेत. त्या पती निधनानंतर माहेरी राहत आहेत.मनकर्ण कदम यांना तीन मुली, एक मुलगा आहे. त्यांनी स्वत:ची दोन एकरची शेती दुसऱ्याला कसण्यासाठी दिली आहे.
भोई प्रतिष्ठानचा उपक्रम : आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 2:13 AM