- अयाज तांबोळीडेहणे - ३० जुलै २०१४ रोजी माळीण दुर्घटना घडली आणि दरडीमुळे धोका असलेल्या गावांचा प्रश्न ऐरणीवर आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पाहणी करण्यात आली. त्यात २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. यामध्ये खेड तालुक्यातील भोरगिरीच्या पदरवाडी आणि भोमाळे या दोन गावांचा समावेश आहे. खरे तर माळीण दुर्घटनेपूर्वी १४ आॅगस्ट १९९४ रोजी भोमाळे गावावर दरड कोसळण्याची घटना घडली होती. यात दोन जणांना जीव गमवावा लागला होता. सह्याद्रीच्या या परिसरात दरडी कोसळण्याच्या धोक्याची घंटा १९९४ मध्येच या घटनेने दिली होती.सकाळी लवकर उठून रोजच्या कामासाठी लगबगीत असलेला भोमाळे गाव एका मोठ्या स्फोटामुळे हादरला. समोरचा डोंगर आपल्याकडे झेपावताना पाहिला आणि भरपावसात लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. सुदैवाने तुटलेला डोंगरकडा पावसाच्या पाण्यात वाहून गावाजवळच्या दरीकडे गेला, तरीही काही मलबा अगदी गावाच्या डोक्यावर विसावला. ६० ते ७० कुटुंबांतली ४०० लोक या वेळी बचावले. दोन बेपत्ता दत्ता केंगले व रामचंद्र वाजे हे अदिवासी शेतकरी मात्र प्रचंड वेगाने येणाऱ्या मातीखाली दबून मृत्युमुखी पडले. तिन्ही बाजूंनी डोंगर असल्याने धोका आजही कायम आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी व अधिकाºयांच्या टीमने भोमाळे गावाला भेट देऊन नदीपलीकडे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली होती. परंतु, २५ वर्षांनंतरही भोमाळे गाव आहे तिथेच आपल्याकडे झेपावणा-या मृत्यूच्या छायेत आहे. दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीत जाणारे बळी खरे तर वेळकाढू प्रशासनव्यवस्थेचे बळी आहेत. या घटनेनंतर तरी प्रशासन सजग होईल, ही अपेक्षा माळीण दुर्घटनेनंतरही फोल ठरली आहे.भोरगिरीची पदरवाडीही रोज मृत्यूच्या सावलीत जगत आहे. अत्यंत प्रतिकूल आणि दुर्गम भाग. कोकणकड्यावर मध्यंतरी (पदरावर) वसलेली १५ अदिवासी कुटुंबांची वस्ती. एकूण ७० लहानमोठी माणसे. जगापासून अलिप्त. रोजीरोटीसाठी फक्त भातशेती, कुठल्याही सुविधा नाहीत. शाळा नाही, वीज नाही; दवाखाना अन् रस्ते तर दूरच. अशा परिस्थितीत डोक्यावर अजस्र सह्याद्रीचा कडा. इतर वेळी घरंगळत येणारे दगड काळजाचा ठेका चुकवत असतातच; परंतु पावसाळ्यात पडणाºया प्रचंड पावसात दरडी कोसळण्याची भीती रात्रंदिवस उशाशी घेऊन पदरवाडीकर मृत्यूच्या छायेत जगत आहेत. पावसाळ्यात जमिनीतून पाणी उफाळते. जंगलात भूस्खलनाच्या अनेक घटना, डोंगरकडा कोसळण्याच्या स्थितीत. दर वर्षी दगडगोटे धबधब्याच्या मार्गाने गावाकडे येतात. या डोंगराचा मोठा भाग गावावर झेपावलेला तसेच डोंगरात जमिनीला पडलेल्या भेगा, अशी सर्व परिस्थिती दरडी कोसळण्यासाठी पूरक असल्याने या गावाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन होण्याची गरज आहे.अजस्र व वेगाने येणाºया दरडींना हे उपाय रोखतील?‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने धोकादायक असलेल्या गावांमध्ये सुरक्षेचे उपाय सुचविले आहेत. निधीमधून संबंधित गावांच्या डोंगरावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दरडप्रवण क्षेत्रात जंगली गटार काढणे, डोंगरउतारावरील दगड फोडणे, डोंगराच्या चढाला स्थिरता येण्यासाठी आणि डोंगरावरील दगडमाती गावात येऊ नये यासाठी गॅबियन वॉल किंवा क्राँक्रीट भिंत बांधणे, डोंगरउतारावर झाडे लावणे आदी कामे करण्यात येणार आहेत.अधिकारी फिरकलेच नाहीतभोमाळे असो किंवा भोरगिरी या गावांत सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही आलेले नाही. खासगी किंवा शासनाचा एकही अधिकारी गावात पोहोचला नाही; मग दरडींबद्दल अहवाल तयार झाला कसा? असा प्रश्न या गावांतील लोकांना पडला आहे. आमचे पुनर्वसन योग्य ठिकाणी लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत.एकही काम आजपर्यंत सुरू नाहीसंरक्षणाच्या दृष्टीने केल्या जाणाºया कामांसाठी सुमारे ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून कामे करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात २३ गावे धोकादायक स्थितीत आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, यांपैकी १६ गावांमध्ये उपाययोजनांची कामे सुरू झालेली आहेत; परंतु भोमाळे व पदरवाडीत यातील एकही काम आजपर्यंत सुरू झालेले नाही.खेड तालुक्यातील भोमाळे आणि भोरगिरीची पदरवाडी या गावांना दरड कोसळण्याच्या धोका आहे. परंतु, मातीखाली असणारे प्रवाहच दरडी कोसळण्यास जास्त कारणीभूत असल्याने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या सर्व्हेनुसार या गावांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन किंवा डोंगरावर उपाययोजना करता येईल, अशी कामे करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पदरवाडी वस्तीला मी स्वत: भेट देऊन पाहणी करणार आहे.- आयुष प्रसाद(सहा. जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी खेड)
भोमाळे, पदरवाडीवर दरडीचा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:57 AM