इंदापूर : गावात पाणी सोडल्याचे कळविण्यासाठी ग्रामपंचायतीवर ‘भोंगा’ बसवण्यात आलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव ग्रामपंचायतीला तब्बल पाच वर्षांपासून गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका विहिरीतील पाणी दुसऱ्या विहिरीत सोडून कमालीची कसरत करावी लागत आहे.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत इंदापूर शहराच्या पश्चिमेला २० किमी अंतरावर पळसदेव हे गाव आहे. तालुक्यातील प्रमुख व मोठी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक असणाऱ्या पळसदेव गावची लोकसंख्या ७ हजार २५८ एवढी आहे. १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. काळेवाडी, बांडेवाडी, शिंदेवस्ती, माळेवाडी शेलारपट्टा, येडेवस्ती या वाड्यावस्त्यांचा ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. उजनी जलाशयाजवळ असणाऱ्या या गावात ५ ओढे, १० बंधारे, ४ तलाव, खडकवासला कालवा अशी सिंचनासाठी उत्तम सोय आहे. मात्र काळ्या पाषाणामध्ये वसलेल्या या गावात उजनी पाणलोट क्षेत्राच्या नजिक विहीर खोदाई केली तरी त्या विहिरीमध्ये पाणी पाझरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाणलोट क्षेत्रात गाव असल्याने टँकर मागणीच्या प्रस्तावातील अटीशर्तींमध्ये ते बसत नसल्याने, शासकीय टँकर मिळत नाही, हे दुखणे आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना येथील ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंतराव बनसुडे म्हणाले, की तीव्र उन्हाळ्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी घटू लागली आहे. पाणलोट क्षेत्रातील विहिरीचे पाणी गावातील विहिरींमध्ये टाकून तेथून गावाला पाणीपुरवठा करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाला करावे लागते आहे. ही कसरत करण्याऐवजी पाणलोट क्षेत्रात जलवाहिनी टाकून थेट गावातील विहिरीत पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजूरीसाठी पाठवला आहे. त्यासाठी किमान एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. शासनाने ही योजना मंजूर केल्यास पाणी पुरवठ्याचा ताण कमी होणार आहे.तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने आदींनी या भागातील शेतीसाठी खडकवासला कालव्यामधून पाणी देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. सध्या मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी गप्प बसत असल्याचा आरोप सध्या विरोधकांकडून होऊ लागला आहे.लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, म्हणून पळसदेव गावात जलशुद्धीकरण यंंत्रणा बसविण्यात आली आहे. पाण्याचे ‘एटीएम कार्ड’ देण्यात आले आहे.दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली नाही. विंधन विहिरीद्वारे तेथे पाणीपुरवठा केला जातो.
पाणी आल्याचा ‘भोंगा’
By admin | Published: April 26, 2017 2:47 AM