टाकवे बुद्रुक : भोयरे (ता. मावळ) येथे भक्ती-शक्ती युवा मंचाच्या वतीने आयोजित सामुदायिक सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध झाली.रविवारी (दि. २४) दुपारी साखरपुडा , हळदीचा कार्यक्रम झाला. सांयकाळी विवाह सोहळ्यापूर्वी वधू-वरांची ढोल-लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन संत तुकोबारायांची भक्ती आणि शिवरायांची शक्ती याची प्रेरणा घेऊन भक्ती-शक्ती मंचाची स्थापना केली आहे. मंचाने तीन वर्षांपूर्वी आंदर मावळात सामुदायिक विवाह सोहळा आयोजनास प्रारंभ केला. या वर्षी विवाहबद्ध झालेल्या १९ जोडप्यांना तीन पोशाख व संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या.या वेळी रामदास काकडे, सचिन शेळके, माउली शिंदे, गणेश भेगडे, ज्ञानेश्वर दळवी, सारिका भेगडे, रामनाथ वारिंगे, शांताराम कदम आदी उपस्थित होते. वारिंगे म्हणाले की, आंदर मावळ हा दुर्गम आदिवासी भाग असून, येथे अनेक जण भूमिहीन होत आहेत. हा विवाह सोहळा साधेपणाने करून अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ते पैसे संसारासाठी द्यावे. नातेवाइकांनी वधू-वरांना भेटवस्तू न देता पैशांचा आहेर करावा. या वेळी आशीर्वाद प्रकाश मीठभाकरे यांनी दिला . स्वागत रवींद्र भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन रवी शेटे यांनी केले. आभार बंडू घोजगे यांनी मानले.(वार्ताहर)
भोयरेत १९ जोडपी विवाहबद्ध
By admin | Published: April 26, 2016 2:18 AM