भोर: शहरातील नवीन पाईप लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून नवीन ३.५ एमएलडीच्या फिल्टरचे काम एक माहिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर नागरिकांना नियमित स्वच्छ पाणीपुरवठा होणार असल्याचे नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी ९० एचपी व ५० एचपीच्या दोन मोटर, तसेच एक डीआय पाईप लाईन एक सिमेंट पाईप लाईन होती. पैकी सिमेंट पाईप लाईन जीर्ण झाल्यामुळे सारखी फुटत असल्याने नियमित पाणी शहरातील नागरिकांना मिळत नव्हते. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिकेला सुमारे १३.५० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. कोरोनामुळे कामाला थोडा उशीर झाला होता. सध्या जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून ३.५ एमएलडीच्या फिल्टरचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे. तर सुमारे २० लाख लिटर पाण्याच्या टाकी साठी ७३ लाख रु निधी मंजूर असून कामही सुरू आहे.
पुढील महिन्यात भोर शहरातील नागरिकांना नियमित,स्वच्छ आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे नगराध्यक्ष निर्मला आवारे यांनी सांगितले.
सदर पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात आले असताना ३३ टक्केच निधी उपलब्ध झाला असून उर्वरित निधी मिळावा यासाठी आमदार संग्राम थोपटे पाठपुरावा करीत आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना केवळ फुकटचे श्रेय घेण्यासाठी काही विरोधक नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.पाण्याचा प्रश्न नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळयाचा असून विरोधकांनी वस्तुस्थितीची माहिती न घेताच पाण्याचे राजकारण करू नये. भोर नगरपालिकेचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून कोट्यवधीची विकासकामे होत असल्याचे काँग्रेसच्या नगरसेवकांनी सांगितले.