मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती आजारी पडल्यास किंवा कोरोना झाल्यास सदर रुग्णांना घेऊन जाण्यास भोर नगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीची रुग्णवाहिका नाही त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. ती पण अनेकदा मिळत नाही. शिवाय खासगी रुग्णवाहिका नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे नगरपालिकेकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे.
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमीत येण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. शिवाय सध्या कोरोनाच्या महामारीमुळे कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास अनेक नागरिकांना स्मशानभूमीत घेऊन जाण्यास शववाहिका नसल्याने अडचणी येत आहे. शववाहिका मिळालीच तर मोठ्या प्रमाणात मोबदला मागितला जातो. हे लोकांना परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही भोरकर संस्थेच्या वतीने सचिन देशमुख यांनी मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात यांना निवेदन देऊन रुग्णवाहिका आणि शववाहिका घेण्याची मागणी केली आहे.