भोर - नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी आपल्या समर्थकांना घेऊन पक्षश्रेठींकडे शक्तिप्रर्दशन करताना ते दिसत आहेत.या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी काहींनी प्रचारही सुरू केला आहे. शहरात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप शिवसेना अशी चौरंगी लढतहोणार असून काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी, तर राष्ट्रवादी व भाजपा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सन २००३मध्ये प्रभाग पद्धत सुरू झाली. त्या वेळी भोरमध्ये १७ प्रभाग होते. तर, २००८ व २०१३मध्ये ४ जागांचा एक असे ३ प्रभाग व ५ जागांचा एक असे एकूण ४ प्रभाग होते. या वेळी या रचनेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. २ जागांचा एक असे ७ प्रभाग, तर ३ जागांचा एक असे एकूण ८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागरचना व आरक्षण जाहीर झाले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. एकूण ९ महिला व नगराध्यक्ष अशा १० महिला निवडून येणार असल्याने पालिकेत महिलाराज पाहावयास मिळेल.काँग्रेसकडे नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ७२ जणांनी अर्ज घेऊन गेले आहेत. तर, इतर पक्षांनीही आपापल्या उमेदवार निवडीची चाचपणी सुरू केली आहे.अनेकांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच गाठीभेटी तसेच थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भोर नगरपालिकेत १९७४मध्ये दिवंगत माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ, तर २००३मध्ये चंद्रकांत सागळे हे थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आले होते.भोर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष पै. रामचंद्र आवारे यांच्या पत्नी निर्मला आवारे, नगरसेवक संजय जगताप यांच्या पत्नी नूतन जगताप, माजी नगराध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे, नगरसेविका डॉ. विजयालक्ष्मी पाठक यांच्यात रस्सीखेच आहे. मात्र, उमेदवारीचा अंतिम निर्णय आमदार संग्राम थोपटे हेच घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून नगरसेवक यशवंत डाळ यांच्या पत्नी शारदा डाळ यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे.तर, भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या माजी नगराध्यक्षा दीपाली सतीश शेटे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेच्या वतीने स्वप्ना देशपांडे इच्छुक आहेत.नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामुळे उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होऊ शकते, अशी चर्चा आहे.मतदारांचा कौैलाकडे सर्वांचे लक्षमागील पाच वर्षांत भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून शहरातील काँक्रीट रस्ते, गटारे, पाईपलाईन, पूल, अग्निशमन यंत्रणा, नगरपालिका इमारत, स्मशानभूमी, घंटागाड्या, घनकचरा व्यवस्थापनयासारखी आदी कामे झाली. यामुळे शहरातील काँग्रेस जोरात आहे. तर, बाकीचे आपले अस्तित्व वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सन १९५५ ते १९६७ या कालावधीत लाल निशान पक्षाचे दिवंगत आमदार जयसिंग माळी यांच्या विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव भोर शहरावर १० ते १५ वर्षे राहिला. १९७०मध्ये काँगेसकडे सत्ता आली.तर, १९७४ ते १९९० पर्यंत दिवंगतअमृतलाल रावळ यांच्या गटाकडे भोर शहराची सत्ता होती.तालुक्यात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची सत्ता होती. १९९०नंतर अनंतराव थोपटे यांनी नगरपालिकेची सत्ता मिळवली. २००८चा अडीच वर्षांचा कार्यकाळ पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा सत्ता काँग्रेसकडे गेली होती.२०१३च्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १४ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. तर, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना-भाजपाला एकही जागा मिळाली नाही. या वेळी भाजपा-सेना सत्तेत असून त्या माध्यमातून वातावरण तयार करून काही प्रमाणात जागा मिळविण्याबरोबरच नगराध्यक्षपदावर टार्गेट करतील, असेच चित्र आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी बॅनर, पोस्टर, फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भोर शहरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली हे नक्की.
भोर नगरपालिका निवडणुकीचे पडघम, इच्छुकांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 2:55 AM