भोर : वेल्हे तालुक्यातील नवीन रस्त्याच्या कामाला भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते यादरम्यान प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रायगडला जोडणारा हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधी, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी रुपये असा एकूण ३० कोटी ३२ लाख रु. निधी मंजूर झाला आहे.
तर संशोधन आणी विकास विभागाकडे ४ कोटींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या भोर तालुक्यातून वरंध घाट, तर मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटमार्गे रायगड जिल्ह्यात जाता येते. आता नव्याने वेल्हे तालुक्यातून रस्ता होणार असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. गेली अनेक वर्षे वेल्ह्यातून महाडला जोडणारा रस्ता करावा, यासाठी नागरिकांची मागणी होती. आणि त्यासाठी आमदार संग्राम थोपटे सातत्याने प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच काम सुरू होईल. वेल्हे ते मढेघाट मार्ग खडतर, सुरुवातीला या रस्त्यासाठी वेल्हे ते मढेघाट हा मार्ग निवडण्यात आला होता. त्याचे सर्वेक्षणदेखील झाले होते. मात्र, अतितीव्र चढ-उतार, नागमोडी वळणे, खडक व टेकड्यांचा भूभाग असल्याने नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल होती. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या काम करणे अतिशय खडतर होते. एवढेच नाही, तर भविष्यात वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक, त्रासदायक होऊ शकतो, असेही समोर आले.
पर्यायी रस्ता ठरला अंतिम
यामुळे नव्याने भोरडी, पिशवी, गुगुळशी, पांगारी ते शेवते (रायगड) हा पर्यायी रस्ता आमदार संग्राम थोपटे यांनी सुचविला. संबंधित विभागाने त्याची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठविला. त्यानुसार १३ किलोमीटरच्या या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
प्रवासाचा वेळ वाचणार
वेल्हे ते भोरडी फाटा ते शेवते हा १८ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. यातील १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता मिळाली आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २.८ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये सपाटीकरण करून साडेसात मीटर डांबरीकरण रस्ता पाच ठिकाणी पाइप टाकण्यात येणार असल्याचे वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. उर्वरित २.२ किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव संशोधन व विकास (आर अँड डी) विभागाकडे पाठविला आहे. त्या कामासाठी ४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नवीन मार्ग हा कमी अंतराचा होणार असल्यामुळे पुण्यातून महाड, रायगडला जाण्यासाठी प्रवासाचा वेळे वाचणार असून, इंधन आणि पैशांचीही बचत होणार आहे. तसेच या मार्गावरील पर्यटनालाही अधिक चालना मिळणार आहे.
असा होणारा नवा रस्ता
या कामात रस्त्याकडेला गटारे, साइडपट्ट्यांसह साडेसात मीटर रुंदीचा डांबरीकरण रस्ता करण्यात येणार आहे. कठीण खडकामुळे (हार्ड रॉक) पिशवी गावाजवळ साडेतीनशे मीटर काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. गुगुळशी व पांगारी येथे साडेसात मीटर रुंद व पंधरा मीटर लांबीचे दोन पूल उभारण्यात येणार आहेत. त्यातील एक पूल सात आणि दुसरा पाच मीटर उंच आहे. या मार्गात ९४ मोठ्या मोऱ्या आणि ९०० मीटरची ‘रिटर्निंग वॉल’ बांधण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे २० ते ४० किलोमीटर अंतर कमी होणार असून, पुणे ते रायगड जिल्ह्यातील महाडला जाण्यासाठी भोर-वरंध मार्ग १४० किलोमीटर रस्ता आहे.
मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटमार्गे महाड १६० किलोमीटर आहे. नव्याने होणारा भोरडी, शेवतेमार्ग १२० किलोमीटर लांबीचा असल्याने २० ते ४० किलोमीटरचा अंतर कमी होणार आहे. यामुळे वेळ व इंधन वाचणार आहे. वेल्हे ते भोरडी फाटा ते शेवते हा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. वेल्हे तालुक्यातील या मार्गावरील गावांतील लोकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. दळणवळण वाढून पर्यटनाला चालना मिळेल. पर्यायाने तालुक्याच्या विकासाला हातभार लागणार आहे.
- संग्राम थोपटे (आमदार, भोर विधानसभा)