भोर :काँग्रेस पक्षाकडून सतत झालेले दुर्लक्ष, विधानसभा अध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळात वेळोवेळी डावलले गेले आणि विधानसभेत झालेला पराभव तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याला मिळत नसलेले कर्ज यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपची वाट धरल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. आज भोरला स्थानिक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून त्यामध्ये भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
२०१९ विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यावेळी त्यांना डावलले गेले. शिवसेनेला बरोबर घेऊन आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळी मंत्रिपदासाठीही संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु, एका रात्रीत माशी शिंकली आणि नाव मागे पडले. असे एक ना अनेकदा थोपटे यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झाला. पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केले. याशिवाय संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असून या कारखान्याला राज्य सरकारने ८० कोटींचे कर्ज मंजूर केले होते. पण लोकसभेला संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला मंजूर केलेले कर्ज नाकारण्यात आले. कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
अमित शाह यांचीही घेतली भेटनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. आज राजगड तालुक्यात आडवली येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होत असून रविवारी २० एप्रिलला भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा
पवार-थोपटे राजकीय वादभोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे मातब्बर आणी निष्ठावंत नेते. सहा वेळा आमदार आणि सलग १४ वर्षे मंत्री त्यामुळे पुणे जिल्ह्यावर त्यांची मजबूत पकड होती. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना शरद पवारांनी ताकद लावून १९९९ साली त्यांचा पराभव केला. त्यानंतर अनंतराव थोपटे हे राजकारणात थोडेसे मागे पडले. लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांचे आव्हान निर्माण केल्यानंतर पवारांनी नवी राजकीय समीकरणे जुळवून आणली. त्यामध्ये भोरच्या थोपटे कुटुंबीयांशी ४० वर्षांपासून असलेल्या राजकीय वैर बाजूला ठेवत अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. परिणामी सुप्रिया सुळे यांना भोरमधून ४३ हजार इतके मोठे मताधिक्य मिळाले आणि त्यांचा विजय सुकर झाला होता.