--
भोर : कोरोनामुळे एसटीची प्रवासी संख्या घटल्याने फेऱ्या कमी झाल्या, त्यामुळे उत्पन्न कमी झाले.त्यातच डिझेलच्या किमती वाढल्यामुळे एसटी बसला डिझेलचा नियमित पुरवठा होत नाही. यामुळे भोर एसटी आगाराला दररोज सुमारे एक लाख रु. तोटा सहन करावा लागत आहे.
भोर एसटी आगारात ११८ चालक व ९३ वाहक असून एसटी डेपोत ४२ व इतर ११ अशा ५३ एसटी बस आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर भोर आगारात २४० फेऱ्यांच्या माध्यमातून दररोज १८ ते १९ हजार प्रवासी १८ हजार किलोमीटर प्रवास करत होते आणि आगाराला दररोज सुमारे ६ लाख उत्पन्न मिळत होते. मात्र, राज्यत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सहा-सात महिने एसटी सेवा पूणर्णपणे बंद होती. मागील तीन -चार महिन्यांत एसटी सेवा सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी फारसे प्रवास करण्यास उत्सुक नाहीत, त्यामुळे प्रवासी संख्या घटल्यामुळे एसटीच्या फेऱ्या निम्म्याने कमी होऊन १३४ वर आल्या, तर ८ ते ९ हजार प्रवासी ७ हजार किलोमीटर प्रवास करतात.
एसटीला उत्पन्न मिळवून देणाऱ्या महत्त्वाच्या फेऱ्या कमी झाल्या असल्याने एसटीला तोटा अधिक होत आहे. डिझेलच्या किमती वाढल्या आणि शिवाय प्रवासी कमी झाले, यामुळे उत्पन्न ६ लाखांवरून अडीच लाखांवर आल्याने एसटी आगाराचा संपूर्ण खर्च ३ लाख ५० हजार आणी उत्पन्न २ लाख ५० हजार होत असल्याने भोर आगाराला दररोज सुमारे एक लाख रु तोटा होत आहे. भोर आगाराला दररोज ३८०० ते ४००० हजार डिझेल लागते त्यासाठी आगारात २१ हजार लिटरची डिझेलची टाकी असूनही एकदा १८ हजार लिटरचा टँकर ओतल्यावर चार ते पाच दिवस डिझेल पुरते. मात्र, सध्या एसटीचे उत्पन्न कमी झाल्याने वेळेत पेमेंट जमा होत नाही त्यामुळे डिझेलचा पुरवठा नियमित होत नाही, अशी माहिती भोरचे आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.
--
कोट
कोरोनामुळे प्रवासी कमी झाल्याने एसटीचे उत्पन्न निम्म्याने कमी झाले असून, डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील एसटी आगारांचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी झाले आहे.यामुळे डिझेलची बिले देण्यास विलंब होत असल्यामुळे एसटी आगारांना दररोज होणारा डिझेलचा पुरवठा नियमित होत नाही.
सचिन गायकवाड (पुणे विभागीय भांडार अधिकारी)
--
चौकट
१० लाख किलोमीटर प्रवास झाला तरी एसटी बस सुरूच आहेत
भोर एसटी आगारात ५३ एसटी बस असून सर्व गाडयाचे १० लाख किलोमीटर प्रवास झालेल्या आहेत. मात्र, तरीही तशाच पध्दतीने गाड्यांचा प्रवास सुरू आहे. यामुळे धूर अधिक सोडणे, ॲव्हरेज न मिळणे, फायरिंगचा मोठा आवाज येणे, एसटीच्या खिडक्या, मुख्य पत्रा, दार खराब होतात. तरी देखील अशा धोकादायक प्रवास वाहन चालक व वाहकांचा आणि प्रवाशांचा सुरू आहे. पूर्वी ५ ते ६ लाख किलोमीटर प्रवास झाल्यावर गाड्या बदलत (स्क्रॅपला) देत होते आणी नवीन गाड्या आणत होते. मात्र, सध्या १३ लाख किलोमीटर प्रवास झाला, तरीही गाड्या तशाच धोकादायक चालवल्या जात आहेत, याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची खरी गरज आहे
--