भोर तालुक्यात जानेवारीपासून ० ते १८ वयोगटातील सुमारे २२५ मुलांना कोरोनाची लागण झाली असून यातील अनेकजण
बरे होऊन घरी गेले आहेत. तर ७ मे ते २३ मे दरम्यान १६ दिवसांत ० ते १५ वयोगटातील ६० मुलांना कोरोनाची लागण झाली यातील काहीजण बरे होऊन घरी गेले काहीजण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर, अनेकजण होम क्वारंटाईन झाले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात येईल अशी शक्यता आहे. मात्र आत्ताच ० ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भोर प्रशासनाकडून तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी अंगणवाडीसेविका,प्राथमिक केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक यांची बैठक घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सूर्यकांत कऱ्हाळे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे व इतर उपस्थित होते.
माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संर्पक करून मुलांना कोरोनाबाबत प्रबोधन करावे आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यात यावी, कोरोना रुग्ण असलेल्या गावातील मुलाना होम क्वाॅरंटाइन करावे, मास्कचा वापर करावा, गर्दी न करता सुरक्षित अंतर पाळावे, सॅनिटायाझरचा वापर करावा, कोरोनाविषयी मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेऊन जनजागृती करावी, कोरोनाची लक्षणे
दिसल्यास दवाखान्यात जावे, औषधोपचार वेळेत घ्यावेत अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याचे भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
.