भोर: वेल्हे तालुक्यातील भोर्डी येथे लघुपटबंधारे तलावास प्रदीर्घ कालावधीनंतर मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरु होण्यास असंख्य अडचणी आल्या होत्या. मात्र, त्यावर मात करून भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. भोर्डी तलावाच्या कामास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. जमिनी हस्तांतराची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ तलावाच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
वेल्हे तालुक्यातील भोर्डी हे गाव वेल्हे तालुक्याच्या पश्चिमेस २० कि.मी.अंतरावर व पुण्यापासून ९० कि.मी.अंतरावर आहे, भाटघर धरणाच्या क्षेत्रात असून धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे,या भागातील लोकांना कोणत्याही पाटबंधारे प्रकल्पाच्या सुविधा मिळाल्या नाहीत,या भागातील लोकांची आर्थिक स्थिती शेतीवर अवलंबून असल्याने तत्कालीन आमदार व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी मौजे भोर्डी येथे लघुपाटबंधारे तलाव बंधाऱ्याची मागणी केली होती,तथापि या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी असंख्य अडचणी होत्या म्हणूनच या बंधाऱ्या च्या कामास फार विलंब झाला होता.
भोर्डी या तलावाच्या कामास महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांचेकडे दि.५/९/२००८ अन्वये रु १५ कोटी ५३ लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. तसेच मुख्य अभियंता लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) पुणे यांचे कार्यालयीन आदेश क्र.५४० सन २००८ दि.२१/१०/२००८ अन्वये रु १५ कोटी ५३ लक्ष किमतीस तांत्रिक मान्यता आहे. भोर्डी लघुपाटबंधारे तलावाची लांबी ४५५ मीटर असून डाव्या तीरावर ०/४५ ते०/३४५ मी भरावाचे काम पूर्ण झालेले आहे उजव्या तीरापासून सारुळे क्र.०/४१० ते ०/४५० मध्ये काम पूर्ण झालेले असून काम अंशत;पूर्ण झालेले असून २०११ ते २०१५ पर्यंत निधीअभावी काम बंद आहे.
लघुपाटबंधारे तलावासाठी एकूण २५.२९ हेक्टर खाजगी जमीन आणि१.८५ हेक्टर वन जमिनीची आवश्यकता आहे. भूसंपादन हा विषय को.प. बंधारा बांधकामास उशीर होण्याचे मुळ कारण आहे. जिल्हाधिकारी पुणे भूसंपादन शाखा यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे,यासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी निधी उपलब्ध असणे आवश्यक आहे याकामी सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठपुरावा केल्याने भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.
सदर बंधाऱ्यास आवश्यक असलेल्या १.८५ हेक्टरऐवजी वनेतर जमीन हस्तांतर करण्याविषयी कार्यवाही सुरु असून दि.५/१/२०१९ रोजी उपविभागीय वन अधिकारी भोर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड व जलसंधारण उपविभागामार्फत मौजे केतकावळे येथील स.क्र.२४१ येथील संयुक्त क्षेत्र पाहणी झालेली असून जिल्हाधिकारी यांचेकडून ७/१२ उतारा वनविभागाच्या नावावर होण्यासाठी आदेश झाल्याने हस्तांतरासाठी पुढील कार्यवाही सत्वर होईल, तदनंतर केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झालेनंतर काम सुरु होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.