लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : परिसरात आॅनलाइन अर्थिक फसवणूक, बेकायदेशीर खासगी सावकारी, अवैध दारूविक्री, जुगार अड्डे आणि मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे अनेक बेकायदेशीर उद्योग-धंदे उजेडात येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये व्हाइट कॉलर गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. या अवैध व्यवसायांना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा असून, या गैरप्रकारांना आळा घालण्याचे मोठे आव्हान भोसरी पोलिसांसमोर आहे. क्राईम पेट्रोल मालिकेतील पूजा जाधव हिने बलात्काराच्या खोट्या तक्रारीतून माया कमविण्याचा उद्योग भोसरी परिसरात उजेडात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याचा पर्दाफाश नुकताच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी केला. शिवाय अवैध सावकारी व दारूविक्रीचे प्रकारही पोलिसांच्या छाप्यात उजेडात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भोसरी परिसरातील अवैध व्यवसायांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याचे सांगितले आहे. राजकीय वरदहस्त असल्यानेच भर लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढत चालले असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्याच आधारावर विविध ठिकाणी छापे टाकून पाहणी करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. परंतु, वाढती लोकसंख्या आणि मोठा एमआयडीसी परिसर पाहता भोसरीतील अवैध व्यवसाय मुळापासून उखडून टाकण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. या गैरप्रकारांचा सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भोसरी उड्डाणपुलाखाली अवैध दारूविक्र ी तसेच वेश्याव्यवसाय चालत असल्याची नागरिकांची तक्र ारी आहेत. या प्रकारावर ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाश टाकला आहे. मात्र, मोठ्या राजकीय नेत्यांच्या भीतीने पोलीस कारवाई करण्यास धजावत नसल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. महामार्गावर बंदी असताना सर्रास दारूविक्री महामार्गांवर दारूबंदी लागू आहे. तरीही भोसरीतून जाणाऱ्या नाशिक महामार्गावरील काही हॉटेलांतून अद्यापही सर्रासपणे दारूविक्र ी केली जाते. लॉटरी सेंटर्स, मटका जुगाराचे अड्डे बिनधास्तपणे चालू आहेत. त्यासाठी राजकीय वरदहस्त आणि पोलिसांना हप्ते असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भोसरी परिसरातील अवैध धंद्यांची थेट दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. अवैध धंद्यातून वाढतेय गुन्हेगारीमटका, जुगार क्लब यासह देशी दारू निर्मिती, दारूची तस्करी, अवैध विक्र ी आजही सुरूच आहे. राजरोसपणे नागरी वस्तीत सुरू असलेले अवैध धंदे सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. वडमुखवाडीतील चिमुरड्या तनिष्का आरु डेचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेतही दिघी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मोशीत घरफोडी तसेच मोबाईल दुकान फोडून चोरी करणार्यांना पोलिसांनी अटक केली. तरीही अद्याप संघिटत गुन्हेगारी व अवैध व्यवसायांचे पेव कमी होत नसून यावर पोलिसांना विशेष नजर ठेवावी लागणार आहे. पोलीस कोणत्याही गुन्हेगारीला थोपवण्यासाठी सक्षम असून त्यादृष्टीने वेळोवेळी कारवाई करत आहोत. काही गुन्ह्यांसंबंधी कारवाईस उशीर होऊ शकतो, पण कोणताही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सतर्कतेने राहणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांत एक पोलीस असतो जो जागृत असायला हवा. कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यांना कळविल्यास कित्येक गुन्ह्यांची उकल तात्काळ होऊ शकते. - भीमराव शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी
भोसरी होतेय अवैध धंद्यांचे केंद्र
By admin | Published: July 13, 2017 1:33 AM