Bhosari Vidhan Sabha 2024: भोसरी मतदारसंघात महेश लांडगे-अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत
By प्रकाश गायकर | Updated: November 21, 2024 13:09 IST2024-11-21T13:09:11+5:302024-11-21T13:09:52+5:30
मतदारांना आणताना कार्यकर्त्यांची दमछाक

Bhosari Vidhan Sabha 2024: भोसरी मतदारसंघात महेश लांडगे-अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत
पिंपरी : भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात भोसरीमध्ये काट्याची टक्कर असून, बुधवारी ४९२ केंद्रांवर मतदान पार पडले. मतदारांची सकाळपासूनच गर्दी होती. दुपारच्या टप्प्यात त्यात आणखी वाढ झाली. सव्वासहा लाख मतदार असल्याने त्यांना आणताना कार्यकर्त्यांची दमछाक होत होती.
भोसरीत एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांचा उत्साह सकाळीच जास्त होता. सकाळी साडेसातला राजमाता जिजाऊ महाविद्यालयात तुरळक मतदार होते, तर महात्मा फुले विद्यालय व आदर्श शिक्षण संस्थेतील केंद्रांवर गर्दी होती. ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या अधिक होती. दिघी, मोशी, बोऱ्हाडेवाडी व जाधववाडी येथील केंद्रांवर सकाळी अकरानंतर मतदारसंख्या जास्त होती. भोसरी गावठाण भागातील केंद्रावर दुपारी १२ ते २ या वेळेत गर्दी कमी होती. मात्र, तीननंतर संख्या वाढली. मोशीतील गायकवाडवस्ती, तुपेवस्ती, संभाजी कॉलनी, भीमनगर आणि आदर्शनगर केंद्रावर सकाळपासून दुपारी दोनपर्यंत गर्दी कायम होती. सायंकाळी कमी झाली. भोसरीतील चक्रपाणी वसाहत, दिघी रोड, रामनगर, धावडेवस्ती आणि सद्गुरूनगरमध्ये सायंकाळी पाचला गर्दी झाली होती.
चऱ्होली, चोविसावाडीत सकाळीच रांगा
चऱ्होली, चोविसावाडी या समाविष्ट गावांमध्ये शेती केली जाते. स्थानिक शेतकऱ्यांसह नव्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उच्चभ्रूंचे वास्तव्य आहे. येथे सकाळीच रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर तुरळक गर्दी होती.
बोटावर शाई लई भारी
चऱ्होली येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत हरित केंद्र करण्यात आले होते. मतदान केंद्राच्या बाहेर फोटो काढण्यासाठी ‘सेल्फी पॉइंट’ उभारण्यात आला होता. त्यावर ‘बोटावर शाई दिसते लई भारी, वृक्षरक्षणाची माझी जबाबदारी’ असा संदेश देत जनजागृती करण्यात आली. त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.