जळगाव येथे झालेल्या आठव्या वरिष्ठ राज्य सॉफ्टटेनिस स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातल्याने आयुषा इंगवलेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१६ वर्षांच्या आयुषाने वरिष्ठ गटात मुलींच्या एकेरीत यजमान जळगाव, यजमान उस्मानाबाद व पुणे संघाच्या अव्वल खेळाडूंवर मात करून आयुषाने विजेतेपद पटकावले. पहिल्या फेरीत जळगावच्या वैष्णवी देशमुखला २-० दुस-या फेरीत अस्मानाबादच्या प्रेरणा देशमुखला २-० उपांत्यफेरीत जळगावच्या पौर्णिमा चव्हाणला २-१ने तर अंतिम फेरीत पुण्याच्या ययाती दांदडेवर ३-० या सेटच्या फरकाने मात करून आयुषाने स्पर्धेतील आपली एकतर्फी विजयाची परंपरा कायम राखली. सलग चार विजयाची नोंद करून तिने पुण्याला सुवर्णपदक जिंकून दिले.
जम्मू-काश्मीरमध्ये येथे ४ ते ८ मार्च २०२१ रोजी होणा-या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टटेनिस स्पर्धेसाठी आता ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. एकेरी प्रमाणेच सांघिक गटातही ती महाराष्ट्राकडून पदकासाठी खेळणार आहे. तसेच अहमदाबाद येथे २१ ते २५ मार्च दरम्यान होणा-या सबज्युनिअर स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे.
गतवर्षी मध्य प्रदेश, दिल्ली पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्रथमच खेळताना पदार्पणातच आयुषाने सुवर्णपदकापर्यंत मजल मारली होती.
भूगाव येथील प्रगतीशील शेतकरी व व्यावसायिक प्रमोद इंगवले यांची आयुषा कन्या असून ती श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. तिला प्रशांत रणदिवे व ज्ञानेश्वर पाडाळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.