पुणे : छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. ज्या कलमाच्या आधारे त्यांना जामीन मिळत नव्हता ते रद्द झाले आहे. आता ते लवकरच तुरुंगाबाहेर येतील, असे वादग्रस्त विधान समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात समता दिन कार्यक्रमात बोलताना केले.महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथे महात्मा फुले समता पुरस्कारांचे वितरण झाले. कार्यक्रमाला राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, खासदार पंकज भुजबळ, परिषदेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, मोतीलाल सांकला आदी उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माळी यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह, उपरणे आणि फुले पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.कांबळे म्हणाले, भुजबळ यांच्यासारखा लढवय्या नेता गेल्या दोन-अडीच वर्षांपासून तुरुंगात आहे. समाजाच्या विकासासाठी लढणारा भुजबळांसारखा नेता लवकर तुरुंगामधून बाहेर यावा व त्यांना जामीन मिळावा यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनीही भुजबळ यांचे कौतुक केले. ते म्हणाले, भुजबळांची अनुपस्थिती या ठिकाणी जाणवत आहे. सामाजिक चळवळीत त्यांनी काम केले नसते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.भुजबळ यांनी केलेल्या संघर्षातूनच महात्मा फुले वाडा आणि परिसराचा विकास झाला आहे. महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, यासाठीही त्यांनीच मोठे काम केले, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.ओबीसी आयोगाला लवकरच घटनात्मक दर्जाओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, संसद अधिवेशनात त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी येथे दिली. खासगी क्षेत्रातही मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भुजबळ लढवय्ये, तुरुंगातून बाहेर यावेत - राज्यमंत्री दिलीप कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:34 AM