भुजबळांनी तुरुंगातूनही राजकारण केले : रामदास आठवले यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:57 PM2018-05-11T16:57:47+5:302018-05-11T17:30:49+5:30
छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरपीआयचे रामदास आठवले यात मागे नसून त्यांनीही भुजबळांनी तुरुंगातून राजकारण केल्याचे विधान केले आहे.
पुणे : छगन भुजबळ हे उत्तम राजकारणी आहेत, मात्र त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकण्यात आलं, पण त्यांचे तुरुंगात असताना देखील राजकारण सुरूच होते असा थेट आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. भुजबळ यांना खोटे आरोप करून माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोवल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांच्या कार्यकाळात बांधलेले महाराष्ट्र सदन हाउस हे अतिशय चांगले झाल्याच म्हणत आठवले भुजबळांची स्तुती करण्यासही विसरले नाहीत. यावेळी नाव न घेता त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. मी भाजपमध्ये आहे म्हणून माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान होऊ शकतो यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. सध्याची राजकीय स्थिती बघता अजून दहा ते पंधरा वर्ष तरी ते पंतप्रधान होणार नाहीत असे भाकीत त्यांनी केले. शुक्रवारी कोरेगाव भीमा येथील पूजा सकट हिच्या घरी जाऊन आठवले यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सकट कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. तसेच आरोपींच्या अटकेचीही मागणी केली.