पहाटे चार वाजता शिवलिंगाला पुजारी व ग्रामस्थ यांच्यावतीने दही, दूध व पंचामृताने आंघोळ घालण्यात आली. महापूजा करण्यात आली. एरवी पांढरी शुभ्र दिसणारी मूर्ती आज पूर्णपणे निळी दिसत होती. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. महाकाय नंदी सजवण्यात आला. प्रदक्षिणा मार्गावरील विठ्ठल-रुक्मिणी यांना पोषाख चढवण्यात आला. भुलेश्वराची पालखी विविध फुलांनी सजवण्यात आली. दुपारी बारा वाजता श्री. भुलेश्वर यांची पालखी पाण्याच्या कुंडावरती पोहोचली. या वेळी पालखीसोबत मोजकेच मानकरी व पुजारी उपस्थित होते. कुंडापाशी देवास आंघोळ घालण्यात आली. माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, उपसरपंच गोकुळ यादव, भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, माजी सरपंच एकनाथ तात्या यादव यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. रीतिरिवाजानुसार दुपारी दीड वाजता महाद्वारावर प्रातिनिधिक स्वरूपात धार घालण्यात आली. स्वतंत्र दिन व दुसरा सोमवार जोडून आल्याने भुलेश्वर मंदिराच्या वन विभागाच्या कमानीबाहेर अनेक भाविकांनी गर्दी केली. मात्र जेजुरी पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त दिल्याने गर्दी पांगवण्यात आली. भारतीय पुरातत्त्व विभाग, जेजुरी पोलीस स्टेशन, उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, वीज विभाग, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी विशेष सहकार्य केले.
मोजक्या मानकऱ्यांमध्ये भुलेश्वरीची पालखी काढण्यात आली.